मुंबई, दि. २५ - रुग्णावर उपचार करत असताना एका रुग्णासाठी एकदा वापरण्यात आलेले इंम्प्लॅंट तसेच त्यासाठीचे उपकरणे दुसऱ्या रुग्णासाठी वापरात येऊ नये यासाठी शासन कठोर पाऊले उचलत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी दिली. विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य सतेज पाटील यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
बापट पुढे म्हणाले, रुग्णांना योग्य उपचार मिळावेत तसेच त्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येईल. उपचारासाठी वापरात येणारे उपकरणे आणि इंम्प्लॅट याची माहिती असणारे नवे संकेतस्थळ लवकरच सुरु करण्यात येत आहे. या संकेतस्थळाद्वारे उत्पादन करणाऱ्या कंपनीने किती उपकरणे विकली गेली आणि कोणत्या रुग्णालयात ती वापरली गेली याची एकत्रित माहिती असणार आहे. यासाठी या विषयाशी संबंधित सर्व विभागांशी समन्वय करण्यात येणार आहे.`अन्न व औषध प्रशासनाद्वारे राज्यातील 37 रुग्णालयांची कसून तपासणी करण्यात आलेली आहे. एकाच उपकरणाला दोन रुग्णांसाठी वापरण्यात येऊन दोन्ही रुग्णांकडून सदर सेवेसाठी पैसे घेतल्याचे निदर्शनास आले होते. त्या सर्व बिलांचीही तपासणी करण्यात येणार आहे. जुन्या रुग्णांची पुन्हा तपासणी करून त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येईल, तसेच अशा रुग्णांना त्यांचे पैसे परत करता येऊ शकतील काय याची देखील शक्यता तपासून पाहण्यात येईल.