पालिकेच्या कारवाईत अडथळा आणणा-या ९६ फेरीवाल्यांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 July 2017

पालिकेच्या कारवाईत अडथळा आणणा-या ९६ फेरीवाल्यांवर कारवाई

मुंबई - मुंबई महापालिका क्षेत्रातील 'बी' विभागात व मध्य रेल्वेच्या मस्जिद स्थानकाजवळ असणा-या युसूफ मेहेर अली मार्गावरील अतिक्रमणे व अनधिकृत फेरीवाले यांच्या विरोधात कारवाई सुरु असतानाच एका अनधिकृत फेरीवाल्याने पालिकेच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीने महापालिकेच्या पथकाला शिवीगाळ करीत धमकी देत हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. याबाबत महापालिकेचे सुरक्षा रक्षक प्रदीप कुंभार यांनी या व्यक्ती विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा नोंदवून संबंधित व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या धमकीला न जुमानता महापालिकेच्या पथकाने कारवाई सुरु ठेऊन ९६ अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई केली, अशी माहिती 'बी' विभागाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार शिरुरकर यांनी दिली.

युसूफ मेहरअली मार्गावर अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव वाढल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. तसेच या मार्गावरील अनेक दुकानदारांनीही आपल्या दुकानापुढील रस्त्यावर तात्पुरत्या स्वरुपाची बांधकामे करुन अतिक्रमण केले असल्याच्याही तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार पालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान काही दुकानदारांनी त्यांच्या दुकानाबाहेर सामान ठेऊन रस्ता अडविल्याचेही निदर्शनास आले. या दुकानदारांना सदर माल उचलण्याबाबत सूचना देण्यात आल्या. मात्र, एका दुकानदाराने सदर कारवाईला विरोध करत सामान हटविण्यास नकार दिला व महापालिकेच्याच पथकाला शिवीगाळ करीत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या दुकानदारा विरोधात पायधुनी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. दरम्यान, या परिसरातील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे यांच्या विरोधातील कारवाई यापुढेही नियमिपणे सुरु राहील, अशी माहिती शिरुरकर यांनी दिली.

Post Bottom Ad