मुंबई, दि. २७ : नव्याने नोंदणी करण्याऱ्या मतदारांना आता रंगीत मतदान ओळखपत्र (पीव्हीसी) मिळणार असून यापुढे हे ओळखपत्र स्मार्ट कार्ड सारखे असणार आहे. मतदान ओळखपत्र वाटप सुरू झाले असून आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिपेंद्र सिंह कुशवाह यांच्या हस्ते ३५ नवीन मतदारांना कार्ड वाटप करण्यात आले.
वांद्रे येथील सेंट कार्डिनल ग्रेशिअस हायस्कूल येथे जिल्हा निवडणूक कार्यालायद्वारे तरुण व वंचित मतदारांसाठी विशेष मतदार नोंदणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उप मुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र ठाकूर, चेतना महाविद्यालयाचे प्राचार्य जोशी, कार्डिनल ग्रेशिअस हायस्कूल चे मुख्याध्यापक आदी यावेळीउपस्थित होते.
मार्गदर्शन करताना कुशवाह म्हणाले, सक्षम राष्ट्र आणि लोकशाही सुदृढ करण्यासाठी मतदान नोंदणी करणे आवश्यक आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण झालेल्या तरुणांनी भविष्यातील आपला देश कसा असावा हे ठरविण्यासाठी मतदान नोंदणी करून घ्यावी. तसेच परिसरातील तरुणांना नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.