मुंबई - राज्यातील आरोग्यसेवेची उपलब्धता आणि दर्जा उंचावण्यासाठी आरोग्यविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा सुरू करण्यात यावी. तसेच बायोमेट्रिकच्या समोरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. या सीसीटीव्ही कॅमेरा रेकॉर्डिंगच्या ७ दिवसांच्या अहवालाची माहिती रूग्णालयांनी वरिष्ठ यंत्रणांना कळवावी, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे दिले.राज्यातील विविध भागांतील आरोग्यसेवा विषयक समस्यांबाबतचा आढावा घेण्यासाठीची बैठक मंत्रालयातील आरोग्यमंत्र्यांच्या दालनात झाली, त्यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.
आरोग्यमंत्री म्हणाले की, परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या समस्या दूर करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या रुग्णालयातील १४ इमारतीपैकी ८ जुन्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडीटचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागास देण्यात आले आहे. त्यावर विभागाकडून उत्तर आल्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. शिवाय या रुग्णालय परिसरात सुरू असलेल्या ५ नवीन इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच त्या आरोग्य सेवेच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. या रुग्णालयासाठी सीटी स्कॅन आणि डायलिसिस मशीन उपलब्ध करून देण्याविषयी शिर्डी संस्थानाशी बोलणी झालेली आहे.
राज्यातील शासकीय रुग्णालयातील 'क' आणि 'ड' वर्गातील आरोग्यसेवकांच्या नियुक्तीसाठीची परीक्षा नुकतीच घेण्यात आली असून निकाल लवकरच जाहीर करण्यात येईल. ३० ऑगस्ट पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन रिक्त जागेवरील आरोग्यसेवक कामावर रुजू होतील, असेही आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
आरोग्यविभागांतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांना मुबलक निधी शासनामार्फत पुरविण्यात येतो. तथापि काही रुग्णालयात रुग्णांची वर्दळ अधिक असल्याने निधी कमी पडतो. अशावेळी आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून रुग्णसंख्या कमी असणाऱ्या रुग्णालयांना देण्यात येत असलेल्या निधीमधील अखर्चित निधी आशा रुग्णालयांकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्यसेवा अधिक सक्षम होईल, असेही आरोग्यमंत्री डॉ. सावंत यावेळी म्हणाले. बैठकीला आमदार दिलीप वळसे पाटील, नीलम गोऱ्हे, राहुल पाटील, नारायण पाटील,आरोग्यविभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, आरोग्यसेवा संचालक डॉ. सतीश पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.