मुंबई, दि.१३ : शेतीनंतर सर्वात जास्त रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगात वस्त्रनिर्मितीसाठी अपारंपरिक ऊर्जेचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत केली. वस्त्रनिर्मितीत होणारा वीजेचा वापर हा एकूण वस्त्रनिर्मितीच्या खर्चाच्या ३० टक्के होतो. तो कमी करण्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या अपारंपरिक उर्जेचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यानी यावेळी दिले.
वस्त्रोद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके,मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रविण दराडे, वित्त विभागाच्या प्रधान सचिव वंदना कृष्णा, आदी उपस्थित होते. यावेळी नवीन वस्त्रोद्योग धोरणाच्या सादरीकरणासोबतच वस्त्रोद्योग विभागाचा आढावा घेण्यात आला. नवीन वस्त्रोद्योग धोरणाच्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. महाराष्ट्रातील पैठणीसोबतच भंडारा जिल्ह्यात तयार होणाऱ्या करवती साडीला भौगोलिक मानांकन (जी.आय मानांकन ) मिळाल्याबदल त्यांनी समाधान व्यक्त केले.