मुंबई - आपल्या वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे फलक, बॅनर्स लावू नयेत तसेच जाहिराती प्रकाशित करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. वाढदिवसानिमित्त ज्यांना योगदान देण्याची इच्छा असेल त्यांनी खास शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या खात्यात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. -
मुख्यमंत्री फडणवीस यांचा २२ जुलैला वाढदिवस असून यावर्षीही त्यांनी कोणत्याही प्रकारची जाहिरातबाजी करू नये. तसेच अभिष्टचिंतनासाठी भेटायला येणाऱ्यांनीही पुष्पगुच्छ, हार-तुरे आणण्याऐवजी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक कर्जमाफी जाहीर केली आहे. या कर्जमाफीसाठी शासनाला आर्थिक मदत देऊ इच्छिणाऱ्यांसाठी मुख्यमंत्री शेतकरी सहायता निधी (CM Farmers Relief Fund) या नावाने स्वतंत्र खाते उघडले असून त्याचा खाते क्रमांक ३६९७७०४४०८७ असा आहे. स्टेट बँकेच्या मुंबई मुख्य शाखेत हे खाते असून तेथे धनादेश, डीमांड ड्राफ्ट किंवा रोखीने आपले योगदान देता येईल. या शाखेचा ब्रँच कोड ००३०० असा असून आय.एफ.एस.सी. कोडSBIN००००३०० असा आहे.