नाशिक : राज्यातील प्रत्येक तालुक्यात नाशिक येथील मेळा बसस्थानकाच्या धर्तीवर अत्याधुनिक तसेच एकात्मिक बसपोर्ट तयार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्मार्टसिटीचं स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नाशिक शहरात एकात्मिक सीसीटीव्ही प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण शहरात फायबर ऑप्टीकचे जाळे टाकण्यात येणार असून संपूर्ण शहर वायफाय करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) मेळा बसस्थानकाच्या ठिकाणी विमानतळाच्या धर्तीवर उत्तर महाराष्ट्रातील वातानुकूलित बसपोर्ट उभारले जाणार आहे. या कामाचा भूमीपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पालकमंत्री गिरीश महाजन, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, खासदार हेमंत गोडसे आणि हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजनी भानसी, एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजीतसिंह देओल, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., एस.टी. महामंडळाचे कार्यकारी अभियंता अ.वा. भोसले, प्रादेशिक परिवहन अधिकारी यामिनी जोशी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, एसटीने सामान्य, गरीब, मध्यमवर्गीय माणसांची मोठी सेवा केली आहे. मात्र, त्याच्या गुणवत्तापूर्ण विकासाकडे लक्ष दिले गेले नाही. प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी शासनाने एसटीमध्ये मोठे फेरबदल झाले. परिवहनमंत्रीच महामंडळाचे अध्यक्ष असतील असा निर्णय झाला. त्यामुळे निर्णय वेगाने होऊ लागले. नाशिक येथे अत्याधुनिक वातानुकूलित बसपोर्ट उभारणीचा भूमीपूजन समारंभ झाला. याच धर्तीवर राज्यातील प्रत्येक तालुक्यात सर्वसुविधायुक्त एकात्मिक बसपोर्ट सुरु करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सगळ्या बसपोर्टना अत्याधुनिक करण्यासाठी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने काम करण्याचा विचार सुरु असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, यापुढील काळात राज्यातील सर्वसामान्यांनाही तितक्याच दर्जेदार सेवा कमी किंमतीत या माध्यमातून देता येतील. मुंबईतील उपनगरी रेल्वे स्टेशन परिसरात शेतकऱ्यांचा भाजीपाला विकण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयामुळे राज्यातील आणि विशेषत: नाशिकमधील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे सांगितले.