वृक्ष छाटणीबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश -
मुंबई / प्रतिनिधी - चेंबूर स्वस्तिक पार्क येथील चंद्रोदय सोसायटी येथील नारळाचे झाड अंगावर पडल्याने एका योग शिक्षिका गुरुवारी सकाळी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर सुश्रुत या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असतानाच शनिवारी सकाळी या महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचे तीव्र पडसाद पालिकेच्या विधी समितीच्या बैठकीत उमटले. पालिका प्रशासनाला धारेवर धरत वृक्ष छाटणीसंदर्भातील सविस्तर अहवाल समितीच्या पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश विधी समिती अध्यक्ष ऍड. सुहास वाडकर यांनी दिले आहेत.
चेंबूर स्वस्तिक पार्क येथील चंद्रोदय सोसायटीत जुने नारळाचे होते. हे झाड कधीही कोसळू शकते अशी भीती येथील नागरिकांना होती. रहिवाशांनी पालिकेच्या एम पश्चिम विभागाकडे यासंदर्भात 17 फेब्रुवारी 2017 ला तक्रार दिली होती. तसेच झाड कापण्यासाठी पालिकेच्या नियमानुसार 1380 रुपयांचे शुल्कही भरले होते. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे झाड चांगल्या स्थितीत असल्याचे प्रमाणपत्र दिले. गुरुवारी सकाळी याच सोसायटीमध्ये राहणाऱ्या कांचन नाथ (58) या गुरुवारी सकाळी योगा क्लासवरून घरी परतत असताना हे झाड त्यांच्या अंगावर पडले. यात त्या जखमी झाल्याने त्यांच्यावर सुश्रुत रुग्णालयात उपचार असुर असतानाच शनिवारी सकाळी कांचन यांचा मृत्यू झाला आहे. या सोसायटीमधील रहिवाश्यांनी व कांचन नाथ यांचे पती रजत नाथ यांनी या दुघर्टनेला मुंबई महापालिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
कांचन नाथ यांच्या मृत्यूचे सोमवारी झालेल्या विधी समितीत चांगलेच पडसाद उमटले. बैठकीमध्ये सर्व पक्षीय सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरत मुंबईत ५० वर्षे जुनी झाडे आहेत हि झाडे कधीही कोसळून चेंबूर सारख्या दुर्घटना घडू शकतात. अशी झाडे तोडण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सर्वच पक्षीय सदस्यांनी केला. यावर प्रशासनाच्यावतीने उपायुक्त सुधीर नाईक यांनी उत्तर देताना पालिका वर्षभर वृक्ष छाटणी करत असल्याचा खुलासा केला. यावर सदस्यांनी वर्षभर वृक्ष छाटणी पालिका करत असेल तर मग कंत्राटदार पावसाळ्यापूर्वी मे महिन्यात का नेमले जातात ? मे महिन्यात कंत्राटदार नेमले जातात ते वर्षभर वृक्ष छाटणी करतात का? असे प्रश्न उपस्थित करत प्रशासनाकडून करण्यात आलेला खुलासा खोडून काढण्यात आला. यावेळी पालिकेने वर्षभर वृक्ष छाटणी करावी अशी मागणी सदस्यांनी केली. यावर विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर यांनी वर्षभरात किती नागरिकांनी वृक्ष छाटणीसाठी अर्ज केले? किती लोकांना वृक्ष छाटणीची परवानगी दिली ? किती वृक्ष छाटणी करण्यात आली ? याचा सविस्तर अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.