कचऱ्याबाबत ब्रॅंड अॅम्बेसेडर नेमण्यास पालिकेला विसर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 July 2017

कचऱ्याबाबत ब्रॅंड अॅम्बेसेडर नेमण्यास पालिकेला विसर


मुंबई / प्रतिनिधी - मुंबईतील कचऱ्याबाबत जनजागृती करण्यासाठी ब्रॅंड अॅम्बेसेडर नेमण्याचा ठराव वर्षभरापूर्वी महापालिकेच्या महासभेत संमत झाला. मात्र, या वर्ष उलटून गेल्यानंतरही प्रशासनाने यावर अभिप्राय दिलेला नसल्याने कचरा समस्येबाबत जनजागृती करण्यास पालिका अयपशी ठरत आहे, असा आरोप भाजपाच्या नगरसेविका समिता कांबळे यांनी केला आहे. मुंबईत कचऱ्याबाबत जनजागृतीची मोठ्या प्रमाणात गरज आहे. केंद्र सरकारने ब्रॅंड अॅम्बेसेडर नेमला आहे. परंतु, वर्षभरापूर्वी महासभेत मंजुर झालेल्या ठरावाच्या अंमलबजावणीचा पालिकेला विसर पडणे, ही र्दुदैवी बाब आहे. कोट्यवधीचा अर्थसंकल्प असूनही मुंबई महापालिकेला हे शक्य झालेले नाही. जनजागृतीवर भर दिला तरच कचऱ्याच्या समस्या सोडविण्यास पालिकेला यश येईल असे मत कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

मुंबईमध्ये दररोज जवळपास नऊ हजार टन कचरा आणि आठशे टन गाळ व दगड माती याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे. देवनार, क्षेपणभूमींची मर्यादा संपली आहे. तर मुलुंड येथील क्षेपणभूमीला नागरिकांचा विरोध आहे. त्यामुळे मुंबईतील कचऱ्याची समस्या गहन होत आहे. त्यामुळे ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची योजना पालिका राबवत आहे. परंतु, त्याची मोठ्या प्रमाणात जनजागृती होत नसल्याने सर्रास कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. कचऱ्यापासून खत व वीज निर्मीतीबाबत प्रशासन उदासिन आहे. त्यामुळे कचरा संकलनावर भर देणे आवश्यक आहे. त्याबाबत जनजागृती करणे, क्षेपणभूमीतील कचऱ्याचे प्रगत व्यवस्थापन करणे, यावर तातडीने आणि स्वतंत्र विचार होऊन जनजागृती करण्यासाठी वर्तमानपत्रे, दूरचित्रवाणी, रेडिओ , प्रसारवाहिन्या , व्हाट्सअप, इ - मेल यामाध्यमातून जनजागृती करण्यासाठी ब्रॅंड अॅंम्बेसेडर नेमावा व त्याचा कृती आराखडा तयार करावा, असा ठराव १२ जूलै २०१६ रोजी भाजपच्या नगरसेविका समिता कांबळे यांनी महासभेत मांडला. हा ठराव एकमताने सभागृहाने मंजूर करुन आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठवला. या ठरावावर प्रशासनाने गेल्या वर्षभरात कोणताही अभिप्राय दिलेला नाही. याबाबत कांबळे यांनी प्रशासनाकडे विचारणा केली असता, केंद्र सरकारने कचऱ्याच्या जनजागृतीसाठी शिल्पा शेट्टी यांना ब्रॅंड अॅम्बेसेडर म्हणून नेमले आहे. मात्र पालिकेने याबाबत अद्याप विचार केला नसल्याचे सांगण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगितले.

Post Bottom Ad