जलवाहिनी दुर्घटना प्रकरणाचे पालिकेत पडसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 July 2017

जलवाहिनी दुर्घटना प्रकरणाचे पालिकेत पडसाद


चार दिवसा नंतरही मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याकडे दुर्लक्ष - 
मुंबई (प्रतिनिधी) - चार दिवसापूर्वी वांद्रे येथील इंदिरानगर परिसरात जलवाहिनी फुटून झालेल्या दुर्घटनेत दोन मुलांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेला चार दिवस उलटले तरी पालिका प्रशासनाने साधी भेट दिलेली नाही. या घटनेनंतर मृत व जखमींच्या कुटुंबांना आर्थिक मदत देऊन माणुसकीचा आधार देण्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पालिका प्रशासन माणूसकी हरवत चालली आहे, असा हरकतीचा मुद्दा सभागृहनेते यशवंत जाधव यांनी बुधवारी स्थायी समितीत मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. या मुद्द्याला समर्थन करून मृत व जखमींच्या कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी नगरसेवकांनी केली.

वांद्रे बेहरामपाडा येथील इंदिरा नगरात शुक्रवारी सकाळी १०. ३५ वाजता वैतरणा येथून येणारी ७२ इंच व्यासाची जलवाहिनी फूटली. या पाण्याच्या प्रवाहात बुडून विघ्नेश डोईफोडे आणि प्रियंका डोईफोडे या दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेला चार दिवस उलटून गेल्यानंतरही पालिकेच्या अधिका-यांनी येथे भेट देऊन संबंधित कुटुंबाना मदत करण्याची माणूसकी दाखवली नाही. याचे पडसाद बुधवारी स्थायी समितीत उमटले. सभागृहनेते यशवंत जाधव यांन हरकतीच्या मुद्द्याव्दारे प्रशासनाचे लक्ष वेधले. पाईपलाईनवर अनधिकृतपणे झोपड्या उभारण्यात आल्या होत्या, यावर प्रशासन जोर देत आहे. मग इतकी वर्ष या अनधिकृत झोपड्या प्रशासनाच्या संबंधित अधिका-यांच्या लक्षात आल्या नाहीत काय? त्याचवेळी या झोपडया का हटवण्यात आल्या नाहीत, असा सवाल करीत याला अधिकारीही जबाबदार आहेत, असे जाधव यांनी स्पष्ट केले. झाड पडून मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला एक लाख रुपयाची तात्काळ मदत दिली जाते, मग अशा घटनांक़डे प्रशासनाची माणूसकी का हरवते. प्रशासनाने संबंधित कुटुंबांना तात्काळ मदत द्यावी अशी त्यांनी मागणी केली. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये व जखमींना वैद्यकीय मदत मिळावी अशी मागणी केली. दरम्यान झाडे पडून त्यात मृत झालेल्या व्यक्तीला आर्थिक मदत केली जाते, तशाप्रकारचा नियम तयार करून अशा घटनांमध्येही मृत व जखमींनाही मदत द्यावी. सदस्यांच्या मागणीचा विचार करून तात्काळ मदत देण्याबाबतचा निर्णय़ प्रशासनाने घ्यावा अशा सूचना अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी केल्या.

Post Bottom Ad