मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर पालिका कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी आझाद मैदानात क्रीडा भवन चालवले जात आहे. या क्रीडा भवनाच्या खर्चाचा ताळेबंद मागील 6 ते 7 वर्षापासून झालेला नाही. त्यामुळे क्रीडा भवनाच्या कारभारात भ्रष्टाचार झाला असल्याचा गंभीर आरोप मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी शुक्रवारी स्थायी समितीत हरकतीच्या मुद्दयाव्दारे केला.
सीएसटी येथील मुंबई महापालिका मुख्यालयासमोर असलेल्या पालिकेच्या क्रीडा भवनाच्या खर्चाचा ताळेबंद मागील 6- ते 7 वर्षापासून झालेला नाही. विशेष म्हणजे या क्रीडा भवनाचे अध्य़क्ष महापालिका आयुक्त असतानाही खर्चाचा ताळेबंद का झाला नाही असा सवाल लांडे यांनी विचारला. क्रीडा भवनात सदस्य़ शुल्क घेतले जाते. 40 लाख रुपयाची मुदत ठेवी आहे. या ठेवीचे काय झालं? किती व्याज वाढले त्याची माहिती मिळायला हवी. क्रीडा भवनात काम करणा-य़ा कर्मचा-यांचे वेतन थकीत आहे, ते कधी मिळणार? सद्या क्रीडा भवनाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. काम सुरू असताना सदस्यांच्या वेतनातून सदस्य शुल्क घेतले जाते आहे. या सर्व गोंधळावरून क्रीडा भवनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा प्रशासनाने खुलासा करावा, अशी जोरदार मागणी लांडे यांनी केली. लांडे यांचा आरोप गंभीर असून प्रशासनाने खुलासा करेपर्यंत हरकतीचा मुद्दा राखून ठेवत असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी जाहीर केले.