पालिकेचे नियोजन नसताना सोसायटीमधला कचरा न उचलण्याचा निर्णय कसा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2017

पालिकेचे नियोजन नसताना सोसायटीमधला कचरा न उचलण्याचा निर्णय कसा


नगरसेवकांनी प्रशासनाला धरले धारेवर -
मुंबई / प्रतिनिधी - मुंबईमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून कचरा उचलण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तरीही पालिकेने २० हजार चौ. मी. चटईक्षेत्र असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील कचरा २ ऑक्टोबरपासून उचलणार नसल्याचे जाहीर केले आहे. पालिका प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतेही नियोजन केलेले नाही. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांना पालिकेने कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिलेल नाही. त्यामुळे अचानक कचरा न उचलण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास करदात्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार असल्याने सर्व पक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत आज प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. पटेल यांच्या हरकतीच्या मुद्द्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी हरकतीचा मुद्दा राखून ठेवल्याचे जाहीर केला. त्यामुळे यावर प्रशासनाला आपली भूमिका मांडावी लागणार आहे.

मुलुंड, देवनारसारख्या डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात येत असल्यामुळे कचरा कुठे टाकणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने २० हजार चौरस मीटर किंवा त्यापेक्षा अधिक चटईक्षेत्र असलेल्या सोसायट्यांना नोटीसा पाठवल्या असून आपल्या कचर्‍याची विल्हेवाट आपल्याच परिसरात लावण्याचे निर्देश दिले आहेत. २ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मात्र या निर्णय लागू होण्यास फक्त दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना पालिका प्रशासनाकडून सोसायट्यांना कोणतेही मार्गदर्शन करण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राजूल पटेल यांनी हरकतीचा मुद्दा मांडून मुंबईमधील सोसायटीं मधील करदात्या नागरिकांची बाजू मांडली. अनेक सोसायट्यांमध्ये पुरेशी जागा उपलब्ध नाही. सोसायट्यांनी कचरा कुठे टाकावा याबाबत मार्गदर्शन केलेले नाही. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीनंतर गोंधळ उडणार असल्याचे पटेल म्हणाल्या. पालिका प्रशासनाने आपल्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणांवरचे कचर्‍याचे डबे उचलले आहेत. मात्र यासाठी पर्यायी व्यवस्था केलेली नाही. नागरिक उघड्यावर कचरा टाकत आहेत. त्यामुळे निर्माण झालेल्या घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पालिका प्रशासनाकडून ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे निर्देश दिले जातात, मात्र प्रत्यक्षात पालिकेच्या गाड्यांमधून ओला व सुका कचरा एकत्र करून नेला जातो.

Post Bottom Ad