महापालिकेचा (अ)पारदर्शक कारभार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2017

महापालिकेचा (अ)पारदर्शक कारभार


देशाची आर्थिक राजधानी आणि जागतिक दर्जाचे शहर म्हणून मुंबईकडे पाहिले जाते. अश्या या शहरामधील घडामोडींकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असते. मुंबईत एखादा काही प्रसंग घडला तर त्याचे जगात पडसात उमटत असते. हे सर्व सांगण्याचे तात्पर्य म्हणजे अश्या मुंबई शहराला सोयी सुविधा पुरवणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला मात्र याचा विसर पडला आहे किंवा जगामध्ये आपली लक्तरे काढू नयेत म्हणून माहिती व आकडेवारी लपवण्याची सुरुवात पालिकेने सुरु केली आहे. यामुळे पावला पावलावर पालिकेच्या पारदर्शकतेचा बुरखा टराटरा फाटत आहे याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.

मुंबईत पावसाळयात पाणी साचणे, रस्त्यावर खड्डे पडणे, विविध आजार पसरून त्यामुळे नागरिकांचा जीव जाणे या गोष्टी पालिकेला नवीन नाहीत. या घटना दरवर्षी घडत आल्या आहेत. यामुळे पालिका प्रशासनावर सतत टिका होत आली आहे. टिका झाली कि तेवढ्या पुरता कारवाई केल्याचा दिखावा केला जातो नंतर आहे तीच परिस्थिती सुरु राहते. यामुळे महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांची कातडी गेंड्याची झाल्याचीही टिका झाली तरीही प्रशासन सुधरत नसल्याने एसीच्या थंड हवेत बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी करदात्या नागरिकांपासून माहिती लपवण्याची सुपारी घेतली का असा प्रश्न उपस्तित होत आहे.

मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडतात. रस्त्यावर खड्डे पडल्यावर या खड्ड्यांची माहिती देण्यासाठी पालिकेने वेबसाईट, एप्स सारख्या सुविधा दिल्या होत्या. या वेबसाईट, एप्स सारख्या सुविधा देताना नागरिकांना मुंबईमध्ये किती खड्डे पडले आहेत, त्यातील किती खड्डे बुजवले आहेत याचा नेमका आकडा नागरिकांना समजत होता. या मिळणाऱ्या माहितीमुळे मिडियामधून पालिकेवर दरवर्षी टिका होत आली आहे. यामुळे पालिकेने वेबसाईट, एप्स सारख्या सुविधा बंद केल्या आहेत. तसेच मिडीयालाही मुंबईमध्ये किती ठिकाणी खड्डे पडले आहेत याचा नेमका आकडा समजू नये याची पुरेपूर काळजी घेतली आहे.

मुंबईत नेहमीच व विशेष करून पावसाळयात अनेक आजार पसरत असतात. या आजारांची आकडेवारी आणि त्या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आजार जास्त पसरलेल्या दिवसात दरदिवसाला, दर आठवड्याला, दर १५ दिवसांनी व दर महिन्याला रुग्णांची, आजारामुळे मृत्यू झाल्यास त्याची आकडेवारी प्रसिद्ध केली जायची. हि आकडेवारी देण्याचे सध्या बंद करण्यात आले आहे. मुंबईत जानेवारी २०१७ पासून स्वाईन फ्लू मुळे २१ तर लेप्टोमुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. पालिकेच्या रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात हजारो रुग्ण दाखल आहेत. तरीही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दरवर्षाप्रमाणे दिली जाणारी आकडेवारी यावर्षी लपवली जात आहे.

दरवर्षी पावसाळयात महापालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या आर्थिक लागेबांध्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचत असते. दरवर्षी साचलेल्या पाण्यामुळे पालिकेवर टिका होत आली आहे. दरवर्षाप्रमाणे याहीवर्षी पालिकेने नालेसफाई चांगली झाल्याने मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा केला होता. मात्र यावर्षीही मान्सून पूर्व पावसातच ४१ ठिकाणी पाणी साचले. सर्वच वृत्तपत्रांनी पाणी साचल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्यावर पालिका प्रशासनाच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत. यामुळे पालिका आयुक्तांनी एसडब्लूडी विभागाचे संचालक लक्ष्मण व्हटकर यांना करणे दाखवा नोटीस दाखवत त्यांची बदली केली आहे. पाणी साचल्याची आकडेवारी वृत्तपत्रे ठळक प्रसिद्ध करत असल्याने आता पावसाळ्याच्या देण्यात येणाऱ्या अहवालातून अशी आकडेवारी देण्याचे बंद करण्यात आले आहे.

मिडीयाला आकडेवारी दिल्याने आपल्याच अब्रूचे धिंडवडे निघत असल्याने अनेक प्रकारची आकडेवारी लपण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त असलेल्या अजोय मेहता यांनी सन २०१७ - १८ चा अर्थसंकल्प सादर करताना ३२ वेळा पारदर्शकता हा शबद वापरला होता. राज्यात आणि केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजपाचा पारदर्शकता हा मुद्दा असल्याने आयुक्तांनी भाजपाला व खास करून मुख्यमंत्र्यांना खुश करण्यासाठी या शब्दाचा वापर केला. या अर्थसंकल्पावरील भाषणात एका ठिकाणी सत्ताधारी शिवसेनेचा वास्तववादी शब्दप्रयोग केला. हे सर्व सांगायचे तात्पर्य म्हणजे आयुक्तांना आणि महापालिकेला सध्या या पारदर्शकपणाचा विसर पडला आहे.

पालिका आयुक्तांनी सन २०१७ - १८ चा अर्थसंकल्प सादर करताना ३२ वेळा पारदर्शकता हा शब्द वापरल्याची आठवण ठेवण्याची गरज आहे. कोणतीही आकडेवारी लपवून पारदर्शक कारभार असल्याच्या डंका करता येत नाही. आकडेवारी लपवल्याने पालिकेचा अपारदर्शक कारभार समोर येत आहे. तरी आयुक्तांना पारदर्शक कारभाराची आठवण करून देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपाच्या पालिकेतील पहारेकऱ्यांनी कान पकडून पारदर्शकता काय असते हे शिकवण्याची गरज आहे. पहारेकरी आयुक्तांना पारदर्शक कारभार शिकवू शकत नसल्यास सत्ताधारी शिवसेनेने पुढाकार घेऊन वास्तववादी आकडेवारी नागरिकांना मिळण्यासाठी आयुक्तांची कानउघाडणी करणे गरजेचे आहे.

अजेयकुमार जाधव

Post Bottom Ad