मुंबई- मुंबईच्या रस्त्यांवर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असले तरी पावसाळ्यात दरवर्षी मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे पडलेले असतात. यावर्षीही पावसात रस्त्यांची चाळण झाली आहे. अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मुंबईभर रस्त्यांची हि अवस्था असताना पालिकेचा कारभार हाकला जाणाऱ्या मुंबईमधील मुख्यालयासमोरील सेल्फी पॉइंटच्या बाजूलाच मोठा खड्डा मुंबईकर नागरिकांचा लक्ष वेधत आहे. मुख्यालयासमोरच मोठा खड्डा पडला असताना हा खड्डा बुजवण्याकडे पालिकेने दुलुक्ष केले आहे. यावरून मुंबईतील परिसरातील इतर रस्त्यांची अवस्था काय असेल असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
दरवर्षी रस्ते बांधणी व त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका कोट्यवधी रुपयाची तरतूद केली जाते. मात्र तरीही रस्त्यावर खड्डे खड्ड्यात रस्ते अशी स्थिती निर्माण होते. मलिष्काने हीच स्थिती गाण्यातून मांडली म्हणून तिचे घरात डेंग्यूच्या अळ्या शोधून तिला नोटिस देण्यात आले. 500 कोटीचा दावा ठोकण्याची मागणीही करण्यात आली. ही तत्परता खड्डे बुजवण्यात का दाखवली नाही अशी टीका करण्यात येते आहे. तीन दिवसाच्या पावसात रस्त्यांची चाळण व्हायला लागली तर उर्वरित पावसात काय स्थिती होईल याची भीती मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पालिकेच्या मुख्यालयासमोरच भल्ला मोठ्या खड्ड्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून पालिकेच्या रस्ते कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील वर्षी 350 कोटींचा रस्ते कामांतील घोटाळा उघ़ड झाल्यानंतरही रस्ते कामांत सुधारणा झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान रस्त्यांवर खड्डे पडू नये म्हणून विदेशातून कोल्डमिक्स तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले आहे, मात्र हे कोल्डमिक्स अद्याप गोदामात पडून आहे. हे कोल्डमिक्स पाऊस गेल्यानंतर वापरणार काय असा सवाल विचारला जातो आहे. मुंबईत पडलेल्या खड्डयांमुळे थोड्या पावसांतही पाणी साचत असल्याचे चित्र आहे. मागील तीन दिवस पडलेल्या पावसांत पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक खोऴंबली होती. त्यामुळे रस्ते कामांवर पालिकेने केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे.