मुंबई - घाटकोपर चेंबूर लिंक रोडपर्यंतच्या उड्डाणपुलासाठी नेमण्यात आलेल्या कंत्राटदाराला कास्टिंग यार्डसाठी बेस्टच्या शिवाजी नगर बस आगाराची जागा भाड्याने देण्याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीत मंजूर करण्यात आला. या निर्णयाला भाजपाच्या सदस्यांनी विरोध केल्याने शिवाजी नगर बस आगाराचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. मात्र काँग्रेस व भाजपाने या पाहणी दौऱ्यावर बहिष्कार टाकल्याने सत्ताधारी पक्षातर्फेच हा पाहणी दौरा आटोपण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव अगोदरच बेस्ट समितीत मंजूर झाल्याने पालिका सभागृहात हा प्रस्ताव आल्यानंतर भाजपा पालिकेत कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे .
शिवाजी नगर बस आगाराची जागा पालिकेच्या कंत्राटदाराने ३० महिन्याच्या कालावधीसाठी प्रति चौ मी ४० रुपये दराने भाड्याने देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.बेस्टच्या महाव्यवस्थापकांच्या प्रयत्नाने सध्याच्या रेडी रेकनर नुसार हा दर १३९ रुपये इतका करण्यात आला. तसा प्रस्ताव बेस्ट समितीत सादर केला असता त्याला भाजपाने विरोध केला तरीही शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने हा प्रस्ताव मंजूर केला. सदर जागा मोकळी असून या जागेचा बस आगारासाठी कोणताही वापर होत नाही. हा भूखंड भाड्याने दिल्याने बेस्टला ३० महिन्यात चार कोटी २१ लाख रुपये भाडे मिळणार आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या बेस्टला मदत होत असल्याने व यामुळे कामगारांच्या पगाराचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याने प्रस्ताव मंजूर करून नंतर पाहणी करावी, अशी मागणी काँग्रेस ने केली होती. तर प्रस्तावाला विरोध करताना भाजपाचे सुनील गणाचार्य यांनी अशाप्रकारे जागा भाड्याने देण्यापूर्वी या ठिकाणी पाहणी दौरा करण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या मागणीनुसार बेस्ट समिती सदस्यांनी बस डेपोच्या जागेला भेट दिली यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष व शिवसेना नगरसेवक व म न से नगरसेवक उपस्तिथ होते. तर या पाहणी दौऱ्याकडे काँग्रेस व भाजपाच्या सदस्यांनी पाठ फिरवली होती.
भाजपाद्वारे प्रस्ताव मंजूर होण्याआधी पाहणी करावी अशी मागणी करण्यात आली होती, मात्र सत्याधाऱ्यानी हा प्रस्ताव रेटून नेला, आता पालिकेत याबाबत आम्ही कोणती भूमिका घेणार ते लवकरच कळेल.
सुनील गणाचार्य - बेस्ट समिती सदस्य भाजपा
चौकट हा निर्णय बेस्टच्या भल्याचा असल्याने जरी आम्ही पाहणी दौऱ्याला गेलेलो नसलो तरी आमचा या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा आहे. मात्र शिवसेना व भाजपाच्या राजकारणात बेस्ट प्रवाशांचे व बेस्टचे प्रचंड नुकसान होत आहे.
रवी राजा - विरोधी पक्ष नेते व बेस्ट समिती सदस्य काँग्रेस