"भीम आर्मी"ला हायजॅक करण्याचा प्रयत्न - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 July 2017

"भीम आर्मी"ला हायजॅक करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रात दलितांवर अन्याय अत्याचार होत असल्याने दलित पँथर नावाची संघटना उदयास आली होती. या संघटनेच्या माध्यमातून ज्या ठिकाणी दलितांवर अन्याय अत्याचार होत होते त्या ठिकाणी जाऊन जशास तसे उत्तर दिले जात होते. यामुळे दलितांच्या मनात दलित पँथरने घर केले होते. पुढे या संघटनेमधील नेतृत्व करणाऱ्या पुढाऱ्यांनी आपली दुकाने वेगळी केल्याने लढवय्यी संघटना असलेली हि संघटना बंद पडायच्या मार्गावर आली. नामदेव ढसाळांनी ती संघटना कशी बशी सुरु ठेवली पण या संघटमधील आक्रमक पण संपला होता.


महाराष्ट्रा प्रमाणेच उत्तर प्रदेशातही दलितांवर अन्याय अत्याचार होत असतात. महाराष्ट्रापेक्षा अन्याय अत्याचाराची संख्या उत्तर प्रदेशात जास्त आहे हे आकडेवारीवरून दिसून येते. उत्तर प्रदेशात जातीवाद मोठ्या प्रमाणात चालत असल्याने या अत्याचाराची संख्या जास्त आहे. बाबासाहेब आंबेडकर अन्याय अत्याचार करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार आहे असे म्हणत. बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवण म्हणून देशभरात अनेक लोक अन्याय अत्याचारा विरोधात आवाज उचलू लागले. उत्तर प्रदेशात हि त्यातील एक युवक म्हणजे चंद्रशेखर आझाद. या आझाद याने आपण चर्मकार असताना भीम आर्मी नावाची संघटना स्थापन केली.

या चंद्रशेखर आझादने उत्तर प्रदेश मधील दलितांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात भीम आर्मीच्या माध्यमातून आवाज उचलत युवकांना एकत्र केले. युवकांचे संघटन बांधले. उत्तर प्रदेशात सहारणपूर येथे दलिताना मारहाण करण्यात आली, त्यांच्या घरांचे नुकसान करण्यात आले. या विरोधात चंद्रशेखर आझाद याने अन्याय अत्याचार करणाऱ्यांना जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली. आझादने हजारो तरुणांना घेऊन दिल्ली गाठली जंतर मंतरवर मोठे आंदोलन करत अन्यायग्रस्त दलिताना न्याय देण्याची मागणी केली. दलितांच्या संघटनेने दिल्ली गाठून आंदोलन केल्याने उत्तर प्रदेशमधील जातीवादी भाजपा सरकारच्या पाया खालची वाळू सरकू लागली. अखेर आझादला दंगल भडकावल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले.

आझाद याने उभी केलेली भीम आर्मी दलित पँथरचे दुसरे रूप आहे असे म्हणायला हरकात नाही. आझाद याने केलेले आंदोलन सोशल मीडियावरून दलितांपर्यंत पोहचले. भारतात सर्वत्र असे अन्याय अत्याचार सुरु असल्याने भीम आर्मी हि संघटना सर्वाना आपली वाटू लागली. यामुळे देशभरातून अनेक राज्यांमधून लाखो दलित युवक भीम आर्मीमध्ये सामील होऊ लागले आहेत. राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात भीम आर्मी पोहचली आहे. भारतात सर्वत्र भीम आर्मी पोहचत असताना त्याला महाराष्ट्रही अपवाद राहिलेला नाही. महाराष्ट्रातील अन्याय अत्याचार सुरूच असल्याने आणि सरकारकडून न्याय मिळत नसल्याने महाराष्ट्रात अशोक कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली भीम आर्मी संघटना काम करू लागली आहे.

महाराष्ट्रात भीम आर्मी स्थापन होत असताना अनेक राजकारण आणि समाजकारणातून हद्दपार झालेले नेते भीम आर्मीची कमांड आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतू भीम आर्मी मधील प्रत्येक जवान दक्ष असल्याने हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. भीम आर्मीचे प्रमुख अशोक कांबळे असताना कांबळे यांची कोणतीही परवानगी न घेता एकाने आपल्या विभागात भीम आर्मीचे कार्यालय सुरु करण्याचा प्रयत्न केला. या व्यक्तीविरोधात मुंबईच्या वाकोला पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देण्यात आली आहे. दलितांच्या स्वयंघोषित नेत्यांकडून समाजाला सुरक्षा मिळत नसल्याने आज भीम आर्मीला युवकांकडून उस्फुर्त असा पाठिंबा मिळत आहे.

समाजातील नेत्यांनी आपल्या समाजाचे प्रश्न सोडवले असते, समाजाला सुरक्षित ठेवले असते तर आज भीम आर्मी सारख्या संघटनेची गरज भासली नसती. परंतू समाजामधील नेत्यांनी समाजकारण करण्यापेक्षा फक्त राजकारण करत आपले भले कसे होईल याचे उपद्व्याप केल्याने आज भीम आर्मी महाराष्ट्रात उभी राहिली आहे. भीम आर्मीमध्ये लाखोंच्या संख्येने युवक सामील होत असल्याने उत्तर प्रदेश सरकार प्रमाणे दलित नेत्यांच्या खुर्च्या हळू लागल्या आहेत. येणाऱ्या काळात भीम आर्मी हि संघटना मोठी झाल्यास आपली राजकारणाची दुकाने बंद होतील म्हणून राजकीय पक्षांनी आपली माणसे कामाला लावली आहेत.

भीम आर्मीकडे जाणाऱ्या तरुणांना वेगळ्या ट्रॅकवर नेण्यासाठी भीम बटालियन नावाची संघटना स्थापन केली आहे. या संघटनेचे प्रमुख हे आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. मुंबईमधील एका पत्रकार परिषदेत आम्ही सरकारमध्ये असलो तरी साधे एसईओ हे पद सुद्धा कार्यकर्त्यांना न मिळाल्याने आंदोलन करत असल्याचे या उपाध्यक्षांनी घोषित केले आहे. १० जुलैला भीम आर्मीचा प्रमुख चंद्रशेखर आझाद याला सोडण्यासाठी व दलितांवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात भीम बटालियन मार्फत मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनाचा प्रचार करण्यासाठी भीम आर्मीके सन्मानमी भीम बटालियन मैदान मे अशी स्लोगन वापरली जात आहे. भीम आर्मीमध्ये ढवळाधवल करायला न मिळालेले अनेक लोक या आंदोलना निमित्त एकत्र आले आहेत. समाजामध्ये आणि राजकारणात आपला ठसा उमटवू न शकलेले लोक भीम आर्मीत मानाचे स्थान न मिळाल्याने सोमवारी आंदोलन करत आहेत अशी चर्चा सध्या आहे. भीम आर्मीला शह देण्यासाठी भीम बटालियन काढण्यात आली. या भीम बटालियन मध्ये काम करण्यासाठी उत्सुक असलेले लोक थेट आरपीआय आठवले गटात प्रवेश करत असल्याने भीम आर्मीला महाराष्ट्रात वाढू द्यायचा नाही याचा विडा आठवले गटाने उचलला आहे का असा प्रश्न सर्वत्र विचारला जात आहे.

यामुळे भीम आर्मी आपल्या जागी काम करत असताना भीम आर्मी संघटना वाढू न देण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. दलित पँथर नंतर समाजात आक्रमक संघटनेची कमी होती. हि कमी आठवले गटाला किंवा त्यांच्या पक्षात काम करणाऱ्याना पुरी करता आली असती. आठवले गट काँग्रेस असो कि भाजपा यांच्या सोबत २५ ते ३० वर्षे सत्तेत आहे. परंतू सत्तेच्या राजकारणात समाजाकडे दुर्लक्ष झाल्याने आता उभ्या राहणाऱ्या संघटना फोडण्याची गरज आठवले गटाला भासू लागली आहे का ? भाजपा बरोबर सत्तेत असल्याने त्याची परतफेड म्हणून भीम आर्मीला रोख लावण्याची सुपारी आठवले गटाने घेतली आहे का याचा खुलासा आंबेडकरी जनतेला आठवले गटाकडून होणे अपेक्षित आहे. भीम आर्मीला रोखण्याचे काम आठवले गट आणि आठवले गटातील पदाधिकारी करत असल्याने युवकांमध्ये संतापाची लाट आहे. या संतापाचा उद्रेक होण्या आधी खुद्द आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दखल घेण्याची गरज आहे.

अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३

Post Bottom Ad