मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून माजी कर्णधार रवी शास्त्री यांची नियुक्ती झाली आहे. ही निवड दोन वर्षासाठी आहे. माजी मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर शास्त्री प्रबळ दावेदार होते. माजी टीम डायरेक्टरपद भूषवलेल्या शास्त्री यांना बीसीसीआयच्या सल्लागार समितीसह कर्णधार विराट कोहलीची पसंती मिळाली.
मुख्य प्रशिक्षकपदासाठी सोमवारी सहा माजी क्रिकेटपटूंची मुलाखत झाली. त्यात शास्त्री यांच्यासह माजी फटकेबाज सलामीवीर वीरेंदर सेहवागसह लालचंद राजपूत, टॉम मूडी, रिचर्ड पायबस आदींचा समावेश होता. मात्र कोहलीचे मत जाणून घ्यायचे असल्याने सल्लागार समितीने अंतिम निवडीसाठी थोडा अवधी मागितला. परंतु, सर्वोच्च न्यायालय नियुक्त सुकाणू समितीने मंगळवारीच प्रशिक्षकाची निवड जाहीर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर संध्याकाळी शास्त्री यांची निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.