मुंबई, दि. १३: राज्यातील विविध आरोग्य संस्थांमध्ये दीर्घकाळापासून नादुरुस्त असलेले सीटी स्कॅन, डायलिसीस मशीन, व्हेंटीलेटर, एक्सरे मशीन अशी सुमारे १३ हजार विविध वैद्यकीय उपकरणे दुरूस्त करून पुन्हा वापरात आणण्यात आली आहेत. यामुळे आरोग्य विभागाच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना त्याचा लाभ मिळत आहे.
राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये असणारी वैद्यकीय उपकरणे व यंत्रसामुग्रीच्या नादुरुस्तीमुळे आरोग्य सेवा रुग्णांपर्यंत पोहोचवण्यामध्ये अडचणी उद्भवतात. या उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी सध्या स्थानिक पातळीवर निविदा मागवून अथवा वार्षिक देखभाल करण्यासाठी निरनिराळया संस्थांना करारबध्द करण्यात येते. मात्र, या प्रक्रियेमध्ये उपकरणांच्या दुरुस्तीसाठी विलंब होत असल्याने त्याचा रुग्णसेवेवर विपरित परिणाम होतो. ही बाब विचारात घेऊन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी या उपकरणांच्या दुरुस्तीसाठी एकच संस्था असावी, असे निर्देश विभागाला दिले होते.
राज्यस्तरावरुन फेबर सिंदुरी मॅनेजमेंट सर्व्हिसेस या संस्थेची निवड करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून आरोग्य संस्थांमधील सर्व यंत्रसामुग्री व उपकरणांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येत आहे. यासाठी शासनाने संस्थेसमवेत सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार या प्रकल्पांतर्गत गेल्या सहा महिन्यात १३ हजार विविध उपकरणांची देखभाल व दुरूस्ती करण्यात आली आहे.
संस्थेने केलेल्या परीक्षणानुसार राज्यात एकूण ६८ हजार ९९५ इतकी उपकरणे होती. त्यामधील जी महत्वाची उपकरणे नादुरुस्त होती, ती उपकरणे सेवा पुरवठादाराने तात्काळ दुरुस्त केल्याने पुन्हा कार्यान्वित झाली. त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा झाला आहे. आतापर्यंत५०६० उपकरणांच्या दुरुस्तीसाठी नोंदणी झाली होती त्यातील ४७३९ एवढी उपकरणे सेवा पुरवठादाराने दुरुस्त केलेले आहेत. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ४३६७ अहमदनगर ३५३६,पुणे ३३०३ तर ठाणे आणि नंदूरबार २००० एवढ्या मोठ्या संख्येने उपकरणांची दुरुस्त करण्यात आली आहे. त्यामध्ये सीटी स्कॅन, डायलीसीस मशीन, व्हेंटीलेटर, डेंटल चेअर, एक्सरे,हिमॅटोलॉजी अॅनालायजर, सी आर्म सिस्टम, याग लेझर, सी पॅप मशीन यासारख्या मोठ्या उपकरणांचा समावेश आहे.
या उपक्रमांतर्गत राज्यातील आरोग्य संस्थांमधील सर्व बायोमेडिकल उपकरणांचे मॅपींग करण्यात आलेले असून त्यांना बारकोड देण्यात आले आहेत. त्यामध्ये आरोग्य संस्थेचे नाव, विभागाचे नाव, उपकरणाचे नाव, खरेदीचा तपशिल, कार्यान्वित किंवा अकार्यान्वित याबाबतची माहिती भरण्यात येते. यामुळे एखादे यंत्र किंवा उपकरण बंद असल्यास, सेवा पुरवठादाराकडे तक्रार दाखल केल्यास त्याला त्या उपकरणाची संपूर्ण माहिती मिळते व त्याच्या दुरुस्तीसाठी प्रतिनिधींमार्फत दुरुस्तीसाठी आवश्यक कार्यवाही तात्काळ करण्यात येते. यासाठी कॉल सेंटर स्थापन करण्यात आलेले आहे त्याचा क्रमांक सर्व आरोग्य संस्थांना कळविण्यात आलेला आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून आरोग्य संस्थामधील अधिकाधिक उपकरणे कार्यान्वित व अद्ययावत ठेवण्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा मानस असून हा प्रकल्प आरोग्य संस्थांसाठी नवसंजीवनी देणारा ठरत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.