पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ११ जुलैपासून ‘अंतरा’ गर्भनिरोधक इंजेक्शन मोफत उपलब्ध - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 July 2017

पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ११ जुलैपासून ‘अंतरा’ गर्भनिरोधक इंजेक्शन मोफत उपलब्ध


मुंबई - महिलांसाठी गर्भनिरोधक म्हणून आता गोळ्या घेण्याची गरज राहणार नाही. यावर पर्याय म्हणून ‘अंतरा’ नावाचे हे नवीन ‘इंजेक्टेबल गर्भनिरोधक’ (डीएमपीए) इंजेक्शन ‘जागतिक लोकसंख्या दिन’ ११ जुलैपासून पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये व दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहे. ११ जुलै रोजी ‘जागतिक लोकसंख्या दिना’निमित्त सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये व प्रसूतिगृहांमध्ये ‘अंतरा‘ या कार्यक्रमाची सुरुवात केली जाणार आहे.  

गर्भनिरोधक म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये अनेक साधने, गोळय़ांचा शोध लागला. गेल्या काही काळापासून इंजेक्शनद्वारे दिल्या जाणाऱया गर्भनिरोधकाचा पर्याय पुढे आला. आजवर खासगी दवाखान्यात दिले जाणारे हे इंजेक्टेबल गर्भनिरोधक यापुढे शासकीय रुग्णालयांमधूनही दिले जाणार आहे. गर्भनिरोधकाचा वापर वाढावा आणि दांपत्याच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘अंतरा’ हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. पालिकेची सर्व रुग्णालये, उपनगरी रुग्णालये, प्रसूतिगृहे, वैद्यकीय महाविद्यालये, चिकित्सालये यामध्ये मोफत उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त महिला व मातांनी या इंजेक्शनचा उपयोग करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. रोज रोज आठवणीने गोळय़ा घेण्यापेक्षा हे इंजेक्शन दर तीन महिन्यांनी एकदा घ्यावे लागणार आहे. गोळय़ांमुळे हार्मोनल असंतुलन होते. तो धोका या इंजेक्शनमध्ये नसतो. स्तनदा मातांमध्ये गोळय़ांचा पर्याय टाळण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मात्र हे इंजेक्शन स्तनदा माताही घेऊ शकतात.

‘अंतरा’ची वैशिष्टय़े - प्रसूतिनंतर आणि गर्भपातानंतर १८ ते ४५ वयोगटातील स्त्रीयांना हे इंजेक्शन घेता येणार आहे. हे इंजेक्शन दर तीन महिन्यांनी दिले जाणार आहे. स्तनपानावर या इंजेक्शनचा कोणताही साइड इफेक्ट होत नसल्यामुळे स्तनदा मातांनाही हे इंजेक्शन घेता येणार आहे. हे दीर्घकालीन तसेच अत्यंत प्रभावी गर्भनिरोधक आहे. ‘अंतरा’ इंजेक्शन बंद केल्यास पुन्हा गर्भधारणा राहू शकते. 

Post Bottom Ad