मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई शहरांसह उपनगरातील पालिका मंडया आणि मोकळ्या जागांचे व्यवस्थित जतन व संवर्धन होणे गरजेचे असल्याने सर्व मंडया पालिका प्रशासनाने सुस्थितीत ठेवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन सुधार समितीचे अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी केले आहे.
सुधार समितीचे अध्यक्ष अनंत नर यांनी पश्चिम उपनगरातील विविध मंडया व मोकळ्या जागांची पाहणी केली. यावेळी नर यांनी वांद्रे (पूर्व) येथील पटेल नरसिंह नत्थुराम चौहान महापालिका मंडई, खेरवाडी मंडई या मंडयांचा विकासाबाबत येत्या सुधार समिती बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच सुधार समिती अध्यक्षांसह सदस्यांनी विलेपार्ले (पूर्व) येथील तेजपाल रोड, दीनानाथ मंगेशकर महापालिका मंडईसह अन्य ठिकाणांची पाहणी केली.यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका श्रद्धा जाधव, नगरसेविका ज्योती अळवणी, नगरसेवक विठ्ठल लोकरे, जावेद जुनेजा, अख्तर रज्जाक कुरेशी, महादेव शिवगण, किरण लांडगे व शेखर वायंगणकर तसेच महापालिकेचे विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.