मुंबई, दि. ३ : विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत दिवंगत राज्यपाल रा.सू. उर्फ दादासाहेब गवई यांचे जीवनकार्य व त्याच्या विधिमंडळ अणि संसदीय कामकाजाच्या योगदानाची माहिती जनतेस होण्यासाठी ‘अजातशत्रू’ या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय रामदास आठवले यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विधीमंडळाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली.
या स्मृतिग्रंथाचे प्रकाशन मंगळवार दि. 25 जुलै 2017 रोजी, मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे होणार असून या कार्यक्रमास विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महसूल मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
या स्मृतिग्रंथाची पृष्ठसंख्या 595 इतकी असून याचे स्वागत मूल्य 500 रुपये इतके आहे. मात्र प्रकाशन पुर्व नोंदणी करणाऱ्या वाचकांसाठी टपाल खर्चासहित 400 रुपये इतके मूल्य ठेवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन मुंबई येथे संपर्क साधावा अशी माहिती विधिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांनी दिली.
या स्मृतिग्रंथाचे चार विभाग आहेत, यामध्ये दादासाहेब गवई यांनी पिठासीन अधिकारी म्हणून दिलेले उल्लेखनीय योगदान, भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारी सामाजिक न्यायाची चळवळपुढे नेण्यासंदर्भातील त्यांचे महत्वाचे कार्य, विधिमंडळ आणि संसदेत त्यांनी व्यक्त केलेले प्रेरक विचार, त्यांची दुर्मिळ छायाचित्रे आणि त्यांच्या संदर्भातील मान्यवरांनी लिहिलेल्या भावस्पर्शी आठवणी या सर्व बाबींचा स्मृतिग्रंथात समावेश असल्याने हा स्मृतिग्रंथ एक अमूल्य दस्तावेज म्हणून ओळखला जाणार असल्याचे मदाने यांनी सांगितले. दादासाहेब गवई यांनी व्यक्त केलेले विचार, विधिमंडळ संसदेतील त्यांची भाषणे, त्यांच्या जीवन कार्यावरील मान्यवरांचे लेख, त्यांचे संक्षिप्त जीवनचरित्र तसेच निर्वाणानंतर सभागृहातील शोकप्रस्ताव आणि मान्यवरांची आदरांजली यांचा या ग्रंथात समावेश आहे.