मुंबई - तक्रारदार घरफोडीची केस शिवडी न्यायालयात हरले आहेत. सदर केसची प्रमाणीत कागदपत्रे काढुन, वरील न्यायालयात अपील करण्यासाठी सहायक सरकारी वकील स्वाती शिंदे (५२) हिने १५ हजार रूपयांची मागणी केली होती. तडजोड केल्यावर पाच हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत एसीबीकडे तक्रार केल्यावर शुक्रवारी स्वातीला लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराचा घरफोडीच्या आरोपासंदर्भातील खटला (केस क्र. ३३२/१४ ) शिवडी सत्र न्यायालयात सुरू होता; परंतु प्रकरणाचा निकाल त्याच्या विरोधात लागला. त्यामुळे त्याविरोधात अपील करता यावे म्हणून त्याला प्रकरणाशी संबंधित प्रमाणित कागदपत्रांची गरज होती. त्याने संबंधित विभागाकडे तशी मागणीही केली होती. मात्र ती तातडीने मिळवून देण्याचे सांगत स्वाती शिंदे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम खूपच जास्त असल्याचे तक्रारदाराकडून सांगण्यात आल्यानंतर शिंदे यांनी त्याच्याकडे ५ हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदारानेही ही रक्कम देण्याची तयारी दाखवत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे शिंदे यांच्याविरोधात तक्रार केली. त्यानंतर ठरल्यानुसार तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताना शिंदे यांना अटक करण्यात आली. त्या वेळी त्यांच्याकडून लाच म्हणून स्वीकारलेली ५ हजार रुपयांची रक्कम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हस्तगत केली आहे.