मुंबई - एका कंपनीला त्यांची कोणतीही थकबाकी नाही असे ’नो ड्यु सर्टिफिकेट’ देण्यासाठी ४ लाखाची मागणी पालिकेच्या जी - दक्षिण विभागाचे वॉर्ड निरिक्षक प्रविण सिंग (४५) यांनी केली होती. करनिर्धारणाचे प्रलंबित काम मार्गी लावण्यासाठी सिंग याने यापूर्वी दोन लाख स्विकारले होते. उर्वरीत रक्कम स्विकारताना सिंग याला एसीबीने शुक्रवारी अटक केली आहे.
तक्रारदार यांची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे जी- दक्षिण विभागात जाहिरात फलकाचे करनिर्धारणाचे काम प्रलंबित होते. ते प्रकरण मार्गी लावत त्याचे ’नो ड्यु सर्टिफिकेट’ देण्यासाठी सिंगने ४ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार सिंग याला सुरुवातीला २ लाख रुपये देण्यात आले. उर्वरीत रक्कमेसाठी सिंगने त्यांच्यामागे तगादा लावला होता. अखेर वैतागून तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेऊन सिंगविरुद्ध तक्रार दिली. ठरल्याप्रमाणे तक्रारदार शुक्रवारी उर्वरीत दोन लाख रुपये घेऊन सिंगच्या कार्यलयात गेले. तेथे पैसे स्विकारताना सिंगला एसीबीने रंगेहाथ अटक केली. पालिकेच्या जी- दक्षिण विभागात कर निर्धारण व संकलन विभागात सिंग वॉर्ड निरिक्षक म्हणून काम करतो. याबाबत एसीबी अधिक तपास करत आहे.