मुंबई, दि. 31 : आदिवासी आश्रमशाळेत जे शिक्षक आणि कर्मचारी गेली अनेक वर्षापासून तासिका तत्वावर किंवा रोजंदारीवर कार्यरत आहेत. त्यांनी भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे, शैक्षणिक पात्रतेचे निकष आणि अनुभवानुसार कर्मचारी भरतीदरम्यान तयांचा सहानुभुतीपूर्ण विचार करण्यात येईल असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी आज विधानसभेत सांगितले.
राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील वर्ग तीन व चार या वर्गवारीतील कर्मचा-यांना सेवेत कायम करण्याबाबत विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सदस्य उदयसिंग पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना सवरा बोलत होते. यावेळी सदस्य दिलीप वळसे पाटील, गणपतराव देशमुख यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
सवरा पुढे म्हणाले, आश्रमशाळेत जे शिक्षक आणि कर्मचारी तासिका आणि रोजंदारीवर कार्यरत आहेत. ते तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले होते. पूर्वीच्या कर्मचा-यांना सरसकट भरतीने नियमीत करता येत नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसारच शासनाने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांनी या भरती प्रक्रियेत सहभागी व्हावे. त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा आणि अनुभवाचा सहानुभुतीपूर्ण विचार शासन करेल, दरम्यान या कर्मचा-यांच्या मानधनात शासनाने वाढ केली असल्याचेही सवरा यांनी सांगितले.