टीवायचे निकाल रखडले - पदव्युत्तर प्रवेशाचा ‘निक्काल' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 July 2017

टीवायचे निकाल रखडले - पदव्युत्तर प्रवेशाचा ‘निक्काल'


मुंबई - मुंबई विद्यापीठाचे जूनमध्ये जाहीर होणारे तृतीय वर्षाचे निकाल यावर्षी जुलैची १० तारीख उलटली तरी जाहीर झाले नसल्याने पदव्युत्तर प्रवेशाचा अक्षरशः ‘निक्काल' लागला आहे. निकालांच्या रखडपट्टीमुळे शेकडो विद्यार्थ्यांची उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली असून अनेकांना मिळणार्‍या प्रमोशनवर पाणी सोडावे लागले आहे. विद्यापीठाच्या या ‘धीम्या’ कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार कोणत्याही परीक्षेचे निकाल परीक्षा झाल्यापासून कमीतकमी ३५ तर जास्तीत जास्त ४५ दिवसांत जाहीर होणे अनिवार्य आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या टीवायच्या अनेक परीक्षा होऊन ९० दिवसांचा कालावधी उलटला तरी निकाल जाहीर झालेले नाहीत. विशेष म्हणजे तृतीय वर्षाच्या निकालांबरोबरच पुनर्मूल्यांकनाचे अनेक निकालही जाहीर करण्यात आलेले नाहीत. दरवर्षी जूनच्या मध्यावर हे निकाल जाहीर होऊन २० जून ते २० जुलैपर्यंत पदव्युत्तर प्रवेश प्रक्रिया पार पडते. मात्र सद्यस्थिती पाहता विद्यापीठाचे निकाल जाहीर होण्यास ऑगस्ट उजाडेल असे बोलले जात आहे.

काय चुकले - 
ऑनलाइन पेपर तपासणी हा निर्णय महत्त्वाकांशी असला तरी हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबवणे गरजेचे होते. मात्र कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी ऐन परीक्षा कालावधीत हा निर्णय घेतल्यामुळेच ही स्थिती ओढावल्याचा आरोप माजी सिनेट सदस्या डॉ. सुप्रिया करंडे यांनी केला आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता कुलगुरूंच्या हट्टापायी हा निर्णय घेतला असून त्याचा नाहक त्रास पेपर तपासणारे प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यापीठाच्या कर्मचार्‍यांनाही होत असल्याचे त्या म्हणाल्या.
परिणाम -
... परदेशी विद्यापीठांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा मार्ग बंद
... देश-राज्यातील इतर विद्यापीठांत प्रवेश घेण्याची संधी हुकली
... नोकरी करण्यार्‍या अनेकांचे प्रमोशन लटकले
.... अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ
... विद्यापीठाचे एमए, एमबीए, लॉसारखे पदव्युत्तर प्रवेश रखडले

निकाल जाहीर करण्यामध्ये असलेल्या सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे आता निकालाचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ४० टक्के निकालाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सर्व निकाल ३० जुलैपर्यंत जाहीर करण्यात आम्ही यशस्वी ठरू.
- डॉ. संजय देशमुख, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ

Post Bottom Ad