स्विस बँकेत पैसा - भारताची 88 व्या स्थानावर घसरण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2017

स्विस बँकेत पैसा - भारताची 88 व्या स्थानावर घसरण


नवी दिल्ली - स्विस बँकेत सर्वाधिक पैसा असणाऱ्या देशांच्या यादीत भारताची 88 व्या स्थानावर घसरण झाली आहे. तर इंग्लंड पहिल्या स्थानावर कायम आहे. परदेशातील इतर ठेवीदारांच्या रकमेच्या तुलनेत भारतीयांचा पैसा केवळ 0.4 टक्के असल्याचं स्विस नॅशनल बँक अर्थात एसएनबीने म्हटलं आहे.

भारत 2015 मध्ये या यादीत 75 व्या, तर 2014 मध्ये 61 व्या स्थानावर होता. भारताचा 2007 पर्यंत स्विस बँकेतील जगभरातील ठेवीदारांच्या यादीत पहिल्या 50 देशांमध्ये क्रमांक होता. तर 2004 मध्ये भारत 37 व्या स्थानावर होता.

माहिती उघड केली जात असल्यामुळे स्विस बँकेतील भारतीय ठेवीदार दुसरीकडे पैसा ट्रान्सफर करु शकतात, असंही बोललं जातं. काळ्या पैशांविरोधात कारवाई सुरु झाल्यापासून भारतीयांचा स्वित्झर्लंडमध्ये हाँग काँग आणि सिंगापूरसारख्या केंद्रांच्या तुलनेत कमी पैसा आहे, असंही स्विस बँकेने म्हटलं आहे.

अमेरिका या यादीत स्विस बँकेतील एकूण 14 टक्के रकमेसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर पहिल्या दहा देशांमध्ये वेस्ट इंडिज, फ्रांस, बहमास, जर्मनी, जर्सी, हाँग काँग आणि लक्झमबर्ग यांसारख्या देशांचा समावेश आहे.

भारतीयांचे स्विस बँकेत 4 हजार 500 कोटी रुपये आहेत. म्हणजेच एकूण जगभरातील एकूण ग्राहकांच्या तुलनेत हा आकडा केवळ 0.4 टक्के एवढा आहे. जो 2015 मध्ये 0.8 टक्के एवढा होता. तर दुसरीकडे पाकिस्तानचाही स्विस बँकेत भारतीयांपेक्षा जास्त पैसा आहे. पाकिस्तान या देशांच्या यादीत 71 व्या स्थानावर आहे.

काळ्या पैशांविरोधातील कारवाईचं यश पाहायचं असेल, तर स्विस बँकेची ताजी आकडेवारी पाहा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या भाषणात म्हटलं होतं. काळ्या पैशांविरोधात अशीच कठोर कारवाई सुरु राहिल, असं त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. मात्र स्विस बँकेतील पैसा कमी झाला आहे. पण हा पैसा दुसरीकडे ट्रान्सफर केला जात असल्याचाही अंदाज वर्तवला जात आहे.

Post Bottom Ad