मुंबई - मराठी न्यूज चॅनेल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रेमप्रकरणातून रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली आहे. नितीन शिर्के असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास परळ रेल्वे स्थानकावर घडली.
मराठी न्यूज चॅनेल मध्ये साऊंड इंजिनिअर असलेल्या नितीन शिर्के याचे त्याच चॅनेलमध्ये पत्रकार असलेल्या एका महिलेवर प्रेम होते. परंतु त्या महिलेने प्रेमाच्या नावाखाली आपली फसवणूक केली असून माझ्या मृत्यूला ती महिला व अन्य दोन जण जबाबदार आहेत, अशी पोस्ट नितीनने फेसबुकवर पोस्ट केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने फेसबुकवर पोस्ट अपलोड केली. त्यात त्याने त्या महिलेला जबाबदार धरले आहे. 'त्या महिलेचे एका पत्रकाराबरोबर प्रेमप्रकरण सुरू होते. असं असतानाही गेल्या तीन वर्षापासून ती प्रेमाच्या नावाखाली मला खेळवत होती. तिनं माझा अक्षरश: वापर केला. तिच्यामुळेच मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या लोकांना शिक्षा मिळायला हवीय,' असं त्यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.