मुंबई, दि. २६ :- घाटकोपरची साईदर्शन इमारत कोसळून १७ निष्पाप रहिवाशांचा झालेला मृत्यू हा अपघात नसून मुंबई महापालिकेच्या भ्रष्ट व्यवस्थेने घात लावून केलेली हत्या आहे, त्याबद्दल संबंधीत पालिका अधिकाऱ्यांवर कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. मुंबई महापालिकेतील बिल्डर, अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचार साखळीवर श्वेतपत्रिका काढण्यात यावी, तसेच दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाख व जखमींनी ३ लाख रुपये देण्याची मागणीही मुंडे यांनी सभागृहात केली.
विधान परिषदेत घाटकोपर दुर्घटनेसंदर्भातील मुद्दा स्थगन प्रस्तावाद्वारे उपस्थित करण्यात आला परंतू तो फेटाळण्यात आल्याने नियम ९७ अन्वये झालेल्या चर्चेत सहभागी होताना घाटकोपर दुर्घटनेची कारणे, वस्तुस्थिती व उपाययोजनांचा उहापोह करीत मुंडे यांनी मुंबई महापालिका व शासनाच्या नगरविकास खात्याच्या भ्रष्ट कारभारावर हल्ला चढवला.
मुंडे यावेळी म्हणाले की, मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यासंदर्भात रेडिओ जॉकी (आरजे) मलिष्काने हलक्या फुलक्या गाण्याने टीका केली तर महापालिकेचे अधिकारी अळ्या शोधत तिच्या घरी गेले, तितकीच तत्परता त्यांनी साईदर्शन इमारतीतील अनधिकृत बांधकाम शोधण्यासाठी दाखवले असते तर हे जीव आज वाचले असते.
ही इमारत ३६ वर्षे जूनी असूनही तीचे स्ट्रक्चरल ऑडीट का करण्यात आले नाही ? गृहनिर्माणमंत्र्यांनी ही इमारत सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला आहे, तो कशाच्या आधारे दिला ? मुंबई महापालिकेच्या पोर्टलवर दररोज अनधिकृत बांधकामांच्या हजारो तक्रारी येतात, परंतु एकाही तक्रारीची दखल घेतली जात नाही. विरोधी पक्षनेता म्हणून आपण स्वत: २५ तक्रारी केल्या परंतु एकाही तक्रारीची दखल घेतली गेली नाही. महापालिकेत अधिकारी, बिल्डर, सत्तारुढ राजकारण्यांची भ्रष्ट युती असल्याचा व त्यातूनच घाटकोपर दुर्घटना घडल्याचा आरोप मुंडे यांनी केला.
साईदर्शन इमारतीच्या तळमजल्यावर अनधिकृत बांधकाम करणारा, पिलर पाडून इमारत खिळखिळी करणारा, इमारत पडल्याबद्दल ज्याला अटक झाली तो आरोपी सुनील सीतप हा शिवसेनेचा पदाधिकारी असून त्याच्या पत्नीने शिवसेनेकडून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली होती याकडेही मुंडे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. स्थानिक पोलिस अधिकारी व महापालिका अधिकारी यांच्या संगनमताशिवाय किंवा या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याशिवाय अनधिकृत बांधकामांना अभय मिळू शकत नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.
मुंबई शहरात गेल्या काही वर्षात घटलेल्या इमारत दुर्घटनांची यादी सादर करुन त्यात बळी गेलेल्या रहिवाशांना महापालिका कशी जबाबदार आहे, हे देखील त्यांनी दाखवून दिले. मुंबईत इमारत पडून, झाड पडून दररोज नागरिक मृत्युमुखी पडत आहेत. मुंबईकरांवरील ही मृत्यूची टांगती तलवार दूर कधी होणार ? होणार की नाही होणार ? हा प्रश्नही मुंडे यांनी विचारला.