मुंबई दि 23 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी राज्यात अवयवदान मोहिम सुरु केली आहे. आता या अवयवदान मोहिमेला यश येत आहे असेच म्हणावे लागेल, कारण सर जे. जे. रुग्णालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान शस्त्रक्रिया पार पडली आहे.
राज्यात अवयवदानासंदर्भात जागृती करण्यासाठी मोठी मोहिम सुरु करण्यात आली आहे. मुंबईस्थित सर जे. जे. रुग्णालयाच्या 172 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच काल रात्री (22 जुलै) ब्रेनडेड रुग्णाचे अवयवदान करण्याची शस्त्रक्रिया पार पडली. जळगाव जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या संगीता महाजन यांना डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केलं होते. त्यानंतर त्यांच्या नातोवाईकांना अवयवदान करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. डॉक्टरांनी संगीता महाजन यांच्या नातेवाईकांना अवयवदानाबाबत आवाहन केले होते. या आवाहनाला नातेवाईकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यामुळे ब्रेनडेड संगीता महाजन यांचे लिव्हर (यकृत) आणि डोळे प्रत्यारोपणासाठी दान करण्यात आले.
संगीता महाजन यांना 17 जुलै रोजी मोटारसायकलने धडक दिली. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना 20 जुलैला रात्री मुंबईतील सर जे. जे. रूग्णालयात हलविण्यात आले. तपासणीनंतर संगीता ब्रेनडेड झाल्याचे जे. जे. रूग्णालयातील डॉक्टरांच्या लक्षात आले. याच दरम्यान संगीता यांचे अवयवदान केल्यास अनेक रुग्णांचे प्राण वाचवणे शक्य असल्याचे डॉक्टरांनी संगीता यांच्या नातेवाईकांना सांगितले. खरे तर संगीता यांचे पती राजेश महाजन यांच्यावर मोठे दु:ख ओढवले होते. दु:खात बुडालेल्या त्यांच्या कुटूंबियांना अवयवदानासाठी तयार करणं हे एक मोठं आव्हान होते. संगीता यांचे पती राजेश महाजन यांना अवयवदानासाठी तयार करण्याची जबाबदारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक रामेश्वर नाईक यांनी घेतली. अवयवदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचणं शक्य असल्याची जाणीव झाल्यानंतर राजेश महाजनही तयार झाले. सर्व तपासण्या झाल्यानंतर संगीता यांचे लिव्हर (यकृत) आणि डोळे दान करण्यात सर जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आणि त्यांच्या टीमला यश आले.
संगीता महाजन यांचे लिव्हर (यकृत) ज्युपिटर रुग्णालयात आणि डोळे सर जे.जे. रुग्णालयात देण्यात आले. संगीता महाजन यांचे लिव्हर काढण्याची शस्त्रक्रिया ज्युपिटर रुग्णालयातील लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ. गौरव चौबळ यांनी केली. याआधीही सर जे.जे. रुग्णालयात दाखल झालेल्या अनेक रुग्णांना ब्रेनडेड घोषीत करण्यात आलं आहे. मात्र रुग्णांचे नातेवाईक तयार होत नसल्याने त्यांचं अवयवदान होऊ शकले नाही. 172 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ब्रेनडेड रुग्णांचे अवयवदान करण्यात आले आहे.
सर जे.जे. रुग्णालयात झालेल्या अवयवदानाविषयी बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले की, संगीता यांच्या कुटुंबाने अवयवदान करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यांच्या अवयवदानाच्या निर्णयामुळे अनेक रुग्णांना मदत होणार आहे. आपले दु:ख बाजूला ठेवून संगीता महाजन यांचे पती राजेश महाजन यांनी अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. राजेश यांना त्यांची पत्नी गेल्याचे दु:ख नक्कीच आहे पण त्यांच्या पत्नीचे लिव्हर (यकृत) आणि डोळे यांचे दान केल्याने इतर जणांचे प्राण वाचू शकणार आहेत. महाराष्ट्रात अवयवदानासंबंधी अधिकाधिक जागृती निर्माण करण्याची गरज असून यानंतरही राज्य शासन अवयवदानाची मोहिम अधिक व्यापक करणार आहे.