मुंबई दि २९: राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यापुढे जात आता आयटीआयच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. सध्या याबाबतची तयारी सुरु असून जानेवारी २०१८ पासून त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
कौशल्य विकास व उद्योजकता विभागाची आढावा बैठक आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे सचिव असिम गुप्ता, कौशल्य विकास आयुक्त ई. रवींद्रन आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र शासनाच्या शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१ मध्ये सुधारणा करण्यात आली असून महाराष्ट्रातील युवकांना जास्तीत जास्त ॲप्रेन्टीसशिप मिळवून देण्यात राज्याने आघाडी घेतली आहे. ॲप्रेन्टीस ॲक्टमधील सुधारणेमुळे राज्यातील युवकांना अधिकाधिक रोजगार देण्याचे तसेच स्वयंरोजगाराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत होणार आहे.
कौशल्य विकास कार्यक्रमात धोरणात्मक सुधारणेअंतर्गत राज्य व्यवसाय प्रशिक्षण परिषदेला स्वायत्तता प्रदान करण्यात आली आहे. कौशल्य विकास संस्थांचे नोंदणीकरण, १५ ते ४५ वयोगटातील युवक युवतींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, शेतकऱ्यांसाठी कृषी आणि संलग्न क्षेत्रातील व्यवसाय प्रशिक्षणासाठी विविध योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाद्वारे आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मदत, तांत्रिक प्रशिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या व्याप्तीत वाढ अशा विविध विषयात कौशल्य विकास विभागाने आघाडी घेतली असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.