घाटकोपरला इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 July 2017

घाटकोपरला इमारत कोसळून 12 जणांचा मृत्यू


पालिकेच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना झाल्याचा स्थानिकांचा आरोप -
मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपर दामोदर पार्कजवळील सिद्धी साई हि चार मजली इमारत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका तीन महिन्याच्या चिमुरडीचा समावेश आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून जखमींवर राजावाडी व शांतिनिकेतन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त चंद्रशेखर चोरे व विनोद चिटोरे संचालक अभियांत्रिकी यांची चौकशी समिती नेमली असून १५ दिवसात या दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

घाटकोपर एलबीएसमी मार्गावरील दामोदर पार्क येथे सिद्धी साई हि तळ मजला अधिक तीन मजले असलेली इमारत १९८१ साली बांधण्यात आली होती. हि इमारत ३६ वर्षे जुनी होती. या इमारतीच्या तळ मजल्यावर सितप नर्सिग होम होते. इमारतीच्या वरच्या मजल्यावर काही कुटंब राहत होती. पालिकेच्या नियमानुसार ३० वर्षपेक्षा जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करणे बंधनकारक आहे. तरीही या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले नव्हते. पालिकेनेही या इमारतीला स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासंदर्भात कोणतीही नोटीस दिली नव्हती. तळ मजल्यावर असणाऱ्या नर्सिग होमच्या नुतनीकरणाचे काम सुरू होते. विनापरवानगी इमारतीच्या ढाच्यात अंतर्गत बदल केले गेल्याने पीलर्सला धोका निर्माण होऊन हे इमारत सकाळी १०. ४५ ला कोसळली.

या इमारतीमध्ये एकूण १५ रूम असून ९ रूममध्ये रहिवाशी राहत होते. तर ६ रूम बंद आहेत. बंद असलेल्या ६ रूम पैकी चार रूम शिवसेनेचे पदाधिकारी सुनील सीतप यांचे आहेत. तसेच तळमजल्यावर सीतप नर्सिंग होम ही सीतप यांच्या मालकीचे आहे. सुनील सीतप यांच्या पत्नी स्वाती सीताप यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या पालिका निवडणुकीमध्ये याच प्रभागातून शिवसेनेनकडून भाग घेतला होता. या विभागात सीतप यांचे चांगलेच प्रस्त असल्याने त्यांच्या नर्सिंग होम मधील बिनापरवानगी कामाकडे पालिकेने दुर्लक्ष केले होते. इमारतीच्या तळ मजल्यावरील पिलरला धक्का लावला जात असल्याने इमारतीला धोका होऊ शकतो अशी तक्रार येथील रहिवाश्यांनी दोन ते तीन वेळा पालिकेच्या एन विभागाकडे केली होती. मात्र पालिकेने या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने हि दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे.

इमारत कोसळल्यावर स्थानिक नागरिक, अग्निशमन दल, पोलीस व एमडीआरएफ दलाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव कार्य सुरु केले आहे. या बचाव कार्यादरम्यान एकूण २२ लोकांना बाहेर काढण्यात यश आले आहे. या २२ लोकांपैकी १२ मृत आहेत. वर्षा सकपाळ (वय २०), गीता रामचंदानी (वय ५८) आणि रीती खनचंदानी वय ४० प्रज्ञा जडेजा ५० वर्षे, गणेश तकडे ३३ वर्षे, विठ्ठल शिरगिरी (वय ३५) या जखमी झाले आहेत. तर, मृतांमध्ये व्ही. रेणुका ठक या तीन महिन्याच्या चिमुरडीसह रंजनबेन शहा (वय ६२) आणि सुलक्षणा खानचंदानी या ८० वर्षीय स्त्रीचा समावेश आहे. तर, इतरांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. बचाव कार्यादरम्यान दोन अग्निशमन दलाचे कर्मचारी जखमी झाले आहे. दुर्घटनेच्या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उप महापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावकर, एन विभाग प्रभाग समितीचे अध्यक्ष तुकाराम पाटील, नगरसेविका बिंदू त्रिवेदी, नगरसेविका अर्चना भालेराव व पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भेट दिली असून बचाव कार्याचा आढावा घेतला.

मृतांची नावे 
रंजनबेन शहा (६२)
सुलक्षणा खानचंदानी (८०)
रेणुका ठक (३ महिने)
मनसुखभाई गज्जर (७५)
अमृता ठक (३१)
पंढरीनाथ डोंगरे (७५)
दिव्या पारस अजमेरा (४८)
मिकुल खानचंदानी (२२)
ऋत्वी प्रितेश शहा (१४)
किशोर खानचंदानी (५०)
मनोरमा डोंगरे (७०)
क्रीषु डोंगरे (१३ महिने)

जखमींची नावे
वर्षा सकपाळ
गीता रामचंदानी
विठ्ठल श्रीगिरी
सुभाष चव्हाण
रिती खणचंदानी
प्रणयाबेन
प्रीतेश शहा
पारस अजमेरा
ऑल़्डीकॉस डिमेलो
धर्मेष्ठा शहा

दोन अग्निशमन जवान जखमी
सुभाष चव्हाण
गणेश टाकडे

दोषींवर कारवाई करण्यात येईल  
ही इमारत बेकायदेशीर नव्हती मात्र नर्सिग होमने नुतनीकरणासाठी परवानगी घेतली नव्हती. हे नर्सिग होम शिवसेनेचे सुनील शितप यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येणार असून दोषींवर कारवाई करण्यात येईल
प्रकाश मेहता, गृहनिर्माण मंत्री

सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करा 
दुर्घटना स्थळाला भेट दिली. हॉस्पिटल बंद होते त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. पिलरला धक्के लावण्यात आले होते. या हॉस्पिटलमधील दुरुस्तीला परवानगी देण्यात आली होती का हे सहाय्यक आयुक्त भागश्री कापसे यांना विचारले असता त्यांना काही आठवत नव्हते. याकामाबाबत स्थानिक नागरिकानी पलीकडे तक्रारी केल्या होत्या. याकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे पूर्व उपनगरचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी कोणीही कोणत्याही पक्षाचा असला आणि कोणताही अधिकारी दोषी असला तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
विश्वनाथ महाडेश्वर, महापौर

चौकशीचा दिखावा केला जातो 
अश्या इमारती पड्ल्या की चौकश्या समित्या नेमण्यात येतात. त्यामधून काहीही पुढे कारवाई होत नाही. बड्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देण्यात येते. यामुळे अश्या घटना थांबवण्यासाठी बड्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी. या प्रकरणात सहाय्यक आयुक्त दोषी असल्याचे दिसत असल्याने त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.
यशवंत जाधव - सभागृह नेते

चौकशी करावी 
हि इमारत धोकादायक किंवा अतिधोकादायक नव्हती. या इमारतीमधील नर्सिंग होममध्ये बेकायदेशीर बदल केले जात होते. या कमल अपालिकेची परवानगी घेण्यात आली नवहती मग पालिका प्रशासन काय करत होते ? नर्सिग होम कोणत्याही पक्षाच्या नेत्याचे असले तरी जिवा पेक्षा पक्ष मोठा नसल्याने या नर्सिंग होम मालकावर व पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
राखी जाधव, गटनेत्या - राष्ट्रवादी पक्ष

Post Bottom Ad