मुंबई - मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये चालविण्यात येणाऱ्या बालवाडीच्या शिक्षकांचे मानधन अत्यल्प असल्याने हे मानधन वाढवावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. या मागणी संदर्भात पालिका प्रशासनाने अखेर वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेकडून बालवाडीच्या शिक्षकांना ३ हजार रुपये मानधन दिले जात होते. वाढत्या महागाईमुळे ही रक्कम वाढवून यात २ हजार रुपयांनी वाढ केली. त्यामुळे बालवाडीच्या शिक्षकांना आता ५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समिती समोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
सन २००७-०८ पासून खासगी संस्थांच्या मदतीने मुंबई महापालिकेच्या ५०४ बालवाड्या सुरु आहेत. या बालवाडीत शिकवणाऱ्या शिक्षकांना सुरुवातीला प्रति महिना १५०० रुपये, तर मदतनिसांना ७५० रुपये मानधन दिले जात होते. सन २००९-१० मध्ये या मानधनात वाढ करून शिक्षिकांचे मानधन २ हजार रुपये तर मदतनिसांचे मानधन १ हजार रुपये करण्यात आले. त्यानंतर सन २०१४-१५ मध्ये या शिक्षक व मदतनिसांचे मानधन ३ हजार व १५०० रुपये एवढे करण्यात आले होते. सध्या वाढत्या महागाईचा विचार करता देण्यात येणारे मानधन अल्प असल्यामुळे सन २०१७-१८ मध्ये बालवाडीच्या शिक्षकांना ५ हजार रुपये तर मदतनिसांना ३ हजार एवढे मानधन प्रति महिना देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ४ कोटी १३ लाख २८ हजार रुपयांचा भार पडणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरी साठी सादर करण्यात आला आहे. स्थायी समितीच्या मंजुरी नंतर पालिका सभागृहाची मान्यता मिळाल्यावर मानधन वाढवून दिले जाणार आहे.