भुवनेश्वर - २२व्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्णपदकांसह एकूण सात पदकांची कमाई केली. जी. लक्ष्मणन आणि मनप्रीत कौर या भारतीय खेळाडूंनी अनुक्रमे पुरुषांच्या ५००० मीटर शर्यतीत आणि महिलांच्या गोळाफेक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. मात्र अनुभवी थाळीफेकपटू विकास गौडाची सोनेरी हॅट्ट्रिक हुकली. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियवर गुरुवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी कौतुकास्पद कामगिरी केली. मनप्रीतने भारताला पहिले सुवर्णपदक पटकावून दिले. तिने १८.२८ मीटर अंतर गोळाफेक करून सुवर्णपदकाची कमाई केली. चीनच्या गुओ टियॅनक्वियन (१७.९१ मी.) आणि जपानच्या आया ओटा (१५.४५ मी.) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या ५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जी. लक्ष्मणनने अनपेक्षित विजय मिळवला. त्याने १४ मिनिटे ५४.४८ सेकंदांत ही शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले. कतारचा यासेर सालेम (१४:५५.८९ से.) आणि सौदी अरेबियाच्या तारिक अहमेद एस. (१४:५६.८३ से.) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकण्यात यश आले. पुरुषांच्या थाळीफेक प्रकारात गौडाला जेतेपद कायम राखण्यात अपयश आले. २०१३ आणि २०१५च्या आशियाई स्पध्रेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या ३४ वर्षीय गौडाला ६०.८१ मीटर अंतरासह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. इराणच्या एहसान हदादी (६४.५४ मीटर) आणि मलेशियाच्या मुहम्मद इरफान (६०.९६ मीटर) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले.
महिलांच्या लांब उडी प्रकारात नीना व्ही. (६.५४ मीटर) आणि नयना जेम्स (६.४२ मीटर) या भारतीय खेळाडूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक जिंकले. महिलांच्या ५००० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या संजिवनी जाधवने १६ मिनिटे ००.२४ सेकंदांच्या वेळेसह कांस्यपदक, जर महिलांच्या भालफेक प्रकारात भारताच्या अनू राणीने ५७.३२ मीटर या कामगिरीसह कांस्यपदक निश्चित केले.