मुंबई / प्रतिनिधी - चेंबूर येथील स्वस्तिक पार्क परिसरातील चंद्रोदय सोसायटीतील नारळाचे झाड कोसळून मृत झालेल्या कांचन नाथ यांच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत द्या अशी मागणी भाजपच्या नगरसेविका आशा मराठे यांनी पालिका सभागृहात केली. आशा मराठे यांनी या घटनेबाबत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता.
२० जुलैला मॉर्निग वॉक करत असताना चंद्रोदय सोसायटीतील नारळाचे झाड पडून कांचन नाथ जखमी झाल्या होत्या. २२ जुलै रोजी उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. पालिकेकडे ते झाड धोकादायक असल्याची तक्रार फेब्रुवारी महिन्यात केली होती मात्र त्यावेळी प्रशासनाने ते सुस्थितीत असल्याचे सांगितले तरीही ते झाड कोसळले त्यामुळे या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. तसेच अनेकदा सोसायटीतील रहिवासी अशा धोकादायक झाडाबबाबत तक्रार करतात परंतु पालिका अधिकारी त्याची दखल घेत नाहीत त्यांच्या दुर्लक्षामुळे या घटना घडतात त्यामुळे यातील दोषींवर ठोस कारवाई करण्यात यावी असेही मराठे म्हणाल्या. विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी कांचन नाथ यांच्यावर झाड पडले त्यांच्यावर उपचारासाठी तीन लाख रुपये खर्च झाले. प्रशासनाच्या चुकीमुळे त्यांचा मृत्यू झाला आहे म्हणून पालिकेने त्यांच्या कुटूंबियांना उपचाराचा खर्च द्यावा असे ते म्हणाले. वार्डातील धोकादायक झाडाबाबत रहिवासी अनेकवेळा तक्रार करतात परंतु प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते.अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नाहीत. तसेच हि धोकादायक झाडे तोडण्याची कामे पावसाळ्यापूर्वी एक महिना आधी सुरु करतात त्यामध्ये तो वेळ पुरेशा नसल्याने वर्षभर धोकादायक झाडे कापली जावीत असा प्रश्न ज्योती आळवणी यांनी उपस्थित केला.