मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानारपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करणाऱ्या पालिकेच्या उप चिटणीसाला न्यायालयाने दहा हजारांचा दंड ठोठावत चांगलाच दणका दिला आहे. दाखल करण्यात आलेली अवमान याचिका हि दिशाभूल करणारी, चुकीच्या पद्धतीची आणि न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाया घालवणारी असल्याचा निकाल देत याप्रकरणी न्यायालयाने दहा हजारांचा दंड ठोठावत सदर दंडाची रक्कम टाटा कर्करोग रुग्णालयाला सात दिवसांच्या आत भरून त्यांची पावती न्यायालयात सादर करण्याचे आदेश दिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, पालिका चिटणीस पदासाठी आयुक्तांनी पदोन्नती समितीच्या शिफारसीनुसार उपचिटणीस प्रकाश जेकटे यांच्याकडे प्रभारी कार्यभार देण्याचा निर्णय महापालिकेच्या मंजुरी सापेक्ष नियमानुसार घेतला. या विरोधात उपचिटणीस रजनिकांत संखे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या अनुषंगाने 16 जून 2017 रोजी केमकर आणि सोनक या न्यायाधिशांच्या खंडपिठाने सदर याचिका मुदतपूर्व दाखल केल्यामुळे यावर कोणतेही भाष्य न करता जेकटे यांच्या प्रस्तावाबरोबर संखे यांचे निवेदन पालिका सदस्यांना प्रसुत करण्यात यावे, असा निर्णय देत सदर बाब पालिकेकडे सोपविली. न्यायालयाच्या निर्णयानुसार संखे यांचे 447 पुष्ठांचे निवेदन तातडीने कामकाज क्रं. 111 नुसार 19 जून 2017 रोजी सर्व सदस्यांकडे पाठविण्यात आले. मात्र असे असतानाही संखे यांनी उच्च न्यायालयात आयुक्त अजोय मेहता यांच्या विरोधात न्यायालयातचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली.
दरम्यान, या अवमान याचिकेवर नापसंती दर्शवित ही याचिका दिशाभूल करणारी, चूकीच्या पध्दतीची आणि न्यायालयाचा वेळ वाया घालविण्याविषयीचे असल्याचे सांगत संखे यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला. मात्र संखे यांनी न्यायलयाची बिनशर्त माफी मागितल्यानंतर न्यायालयाने हि रक्कम 10 हजार रुपये करुन सदर दंड टाटा कॅन्सर रुग्णालयाता सात दिवसात भरुन पावती न्यायालयात सादर करण्याचे आदेश देत संखे यांची याचिका निकाली काढली.