मुंबई, दि. 21 : राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित खाजगी शाळांतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी तसेच नेमकी पटसंख्या समजण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती आधार क्रमांकाशी जोडण्याचे काम तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
राज्यातील शैक्षणिक सुधारणांबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आज आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील एकूण विद्यार्थी संख्या आणि त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी शासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजना यांचा मेळ साधताना विद्यार्थ्यांची नेमकी संख्या उपलब्ध असणे आवश्यक आहे. आधार क्रमांकाशी विद्यार्थ्यांची माहिती जोडल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना राबविताना याचा उपयोग होईल. यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक संबंधित शाळांकडे पाठवून त्या शाळांकडून ती माहिती पडताळून घ्यावी. तसेच हे काम तातडीने पूर्ण करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील सर्व शाळांची अचूक माहिती संकलित करून ती पब्लिक क्लाऊडवर ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
शिक्षकांच्या नियमित उपस्थितीसाठी शाळांमध्ये फेस रिडींग असलेले बायोमेट्रीक मशिन सक्तीचे करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्य शासनाने राबविलेल्या आणि भविष्यातील उपाययोजना यासंदर्भात मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या बैठकीस, मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम, शिक्षण विभागाचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.