मुंबई - मुंबईत स्वाईन फ्लूचा आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी २०१७ ते २२ जून २०१७ पर्यंत मुंबईत स्वाईन फ्लूमुळे १० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील ६ रुग्ण मुंबई बाहेरील आहेत. मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील साथ रोग नियंत्रण कक्षात प्राप्त माहितीनुसार, जून महिन्यात स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याची आकडेवारी नोंद झाली आहे.
स्वाईन फ्लूमुळे ३ मृत्यू -
धारावी येथील ७ महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या महिलेला ८ जूनपासून ताप, खोकला, श्वासास त्रास व घसा दुखणे असा त्रास होत होता. ११ जून रोजी तिला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. १३ जून रोजी तिचा स्वाईनमुळे मृत्यू झाला. मानखुर्द येथील ४५ वर्षीय व्यक्तीला ८ जूनपासून ताप, श्वासास त्रास आणि खोकल्यातून रक्त असा त्रास उद्भवला होता, त्या व्यक्तीस क्षय रोग होता. ११ जून रोजी त्या व्यक्तीस पालिकेच्या रुग्णालयात दाखल केले, १६ जून रोजी स्वाईन फ्लूमुळे बळी गेला. १८ जून रोजी मालवणी येथील ३५ वर्षीय महिलेचाही स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे.
पालिकेतर्फे सर्व्हेक्षण -
गेल्या आठवड्यातील स्वाईन फ्लूच्या बळीनंतर पालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईत धारावीत ५०० घरांचे व २६१४ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले. या परिसरात ४ रुग्णांना स्वाईन फ्लू सदृश लक्षणे आढळली, त्यांच्या उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे, मानखुर्द परिसरात ४७५ घरांचे व १३८४ लोकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले, येथे कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत. तर मालवणी परिसरात ४९२ घरांचे २४६९ लोकसंख्येचे सर्व्हेक्षण करण्यात आले, त्यापैकी केवळ एका व्यक्तीत स्वाईन फ्लू सदृश लक्षणे आढळली. त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहेत.