मुंबई / प्रतिनिधी - मुंबईला पावसाने झोपडून काढले आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाची संततधार मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कायम राहल्याने मुंबईच्या विविध सखल भागात पाणी साचले. सायन व कुर्ला रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी साचल्यामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांचे हाल झाले. रस्ते वाहतूकीवर ही परिणाम झाल्याने वाहतूक कोंडीत भर पडली. मात्र दुपारनंतर पावसाचा जाेर अाेसरला. माहिम खाडीत एक मुलगा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला असून रात्री उशीरापर्यंत त्याचे शोधकार्य सुरु होते. मंगळवारी सकाळी ८ ते दुपारी 3 कुलाबा येथे १०.२ मि.मी तर सांताक्रूझ येथे १५. ४ मि.मी पावसाची नाेंद झाली. दरम्यान, येत्या 24 तासात मुंबई शहर व उपनगरात मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे.
यंदा जून महिन्याचे तीन आठवडे पावसाविना गेल्यानंतर शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. रविवारी मुंबईला झोपडल्यानंतर सोमवारी दिवसभर थोडीशी उसंत घेतली. मात्र सोमवारी रात्रीपासून पुन्हा मुसळधार पावसाळा सुरुवात झाली. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे हिंदमाता , किंग्ज सर्कल आदी भागात पाणी साचले. परंतु, मुंबई महानगरपालिकेने साचललेले पाणी काढण्यासाठी पंप बसविले असल्याने पाण्याचा उपसा लवकर झाला. परिणामी या भागात जास्तकाळ पाणी साचून राहिले नाही. पावसामुळे कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा थाेडीफार विस्कळीत झाली हाेती. मध्य रेल्वे 40 मिनिट तर पश्चिम रेल्वे 15 मिनिट उशीराने धावत होत्या. हार्बरमार्गावरील वाहतूक कोलमडली होती. तर काही ठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. यामुळे वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात येत होत्या. सायन रोड नं. 24 वरील विद्याविहार (प) येथे पाणी साचल्याने बेस्टची वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. त्यामुळे तीन दिवसांच्या सुट्टीनंतर कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले.
३९ ठिकाणी झाडे पडली -
शहरात ९, पूर्व उपनगरात १६ व पश्चिम उपनगरात २४ अशा एकूण ३९ ठिकाणी झाडे पडण्याच्या तक्रारींची नाेंद झाली. या घटनेत कोणीही जखमी नसल्याचे पालिकेतून सांगण्यात आले.
चांदिवलीत जमीन खचली -
चांदिवली येथील इमारत क्रमांक 9 येथील जमीन खचल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव या इमारतीची एक विंग रिकामी करण्यात आली. तसेच या ठिकाणचे दोन्ही मार्ग बंद करण्यात आले आहेत.
खाडीत मुलगा बुडाला -
फिशरमन काॅलनीजवळील माहिम खाडीत दुपारच्या वेळेस एक मुलगा पडला. पाण्याचा प्रवाहबरोबर तो वाहून गेला. अग्निशमन दलाच्या जवांनाना या घटनेची माहिती मिळताच त्यानी घटनास्थळी धाव घेवून त्याचा शाेधकार्य सुरु केले आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत त्याचा शोध लागला नसल्याचे समजते. तर दहिसर येथील नदीत सकाळी अाठ वाजण्याच्या सुमारास महानंदा बुटके ही ५२ वर्षाची महिलापडली. या महिलेला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढून नजीकच्या करुणा रुग्णालयात उपचार्थ दाखल केसे. सध्या या महिलेची प्रकृती स्थिर अाहे.
समुद्राला उधाण; ४.८ मीटर उंचीच्या लाटा -
मुंबईच्या समुद्रात दुपारी २.३९ मिनिटांनी उधाण अाल्यामुळे समुद्र खवळलेला हाेता. समुद्र किनाऱ्यावर जवळपास ४.८ मीटरच्या उंच लाटा अादळत हाेत्या. त्यामुळे खवळलेल्या समुद्रापासून सावध राहण्याचे अावाहन करण्यात अाले हाेते. दुपारीही जाेरदार पाऊस सुरू राहिला असता तर हे पाणी शहरात घुसण्याची शक्यता हाेती. परंतु सुदैवाने दुपारनंतर पावसाचा जाेर कमी झाला. उंच लाटा अंगावर घेण्याचा अानंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मरिन ड्राईव्ह आणि गेटवे अाॅफ इंडिया या ठिकाणी माेठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे चित्र दिसून येत होते.