मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत मेट्रोचे काम जोरात सुरु असून अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पाडण्यात आले आहेत. पावसाच्या दिवसात रस्त्यावर खड्डे पाडण्यास बंदी असताना मेट्रोसाठी मात्र अशी बंदी नसल्याचे दिसत आहे. यामुळे मेट्रोला वेगळा न्याय का असा प्रश्न पालिकेतील सभागृह नेते यशवंत जाधव यांनी उपस्थित केला आहे. पावसाळयात मेट्रोसाठी खड्डे खोदण्यावर बंदी घालावी अशी मागणी जाधव यांनी पालिका आयुक्तांना पाठवलेल्या पत्राद्वारे केली आहे.
मुंबईत पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचे रस्त्याचे काम केले जात नाही. पावसाळ्यापूर्वी रस्ता खोदला असल्यास तो रस्ता पुन्हा होता तसा करावयाचा असतो. असे अनेक पालिकेचे नियम असताना या नियमांकडे दुर्लक्ष करत भर पावसात मेट्रोचे काम सुरु आहे. मेट्रोच्या कामासाठी अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. वास्तविक पाहता मेट्रोचे काम करणाऱ्या कंपनीने हे खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवायला हवे होते. मात्र मेट्रोने असे खड्डे न बुजवल्याने या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत आहे. या साचलेल्या पाण्यात पडून एखाद्या व्यक्तीचा किंवा वाहनाचा अपघात होऊ शकतो. मुंबईत इतर सर्व एजन्सी आपले काम पावसाळयात बंद ठेवतात. तसेच मेट्रोनेही काम बंद करावे अशी आमची मागणी नाही. मात्र मेट्रोने पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे खोदु नये अशी मागणी यशवंत जाधव यांनी केली आहे. एखाद्या खड्ड्ड्ड्यात पडून कोणाचा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी पालिका घेणार का असा प्रश्नही जाधव यांनी आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात विचारला आहे. पालिका आयुक्तांनी मेट्रोने खोदलेले खड्डे त्वरित बुजवावेत अन्यथा मेट्रोसाठी महापालिका वेगळा न्याय लावत असल्याचे दिसून येईल असे जाधव यांनी म्हटले आहे.