मुंबई / प्रतिनिधी - मुंबईत अनेक ठिकाणी मेट्रोचे काम सुरू आहे. या ठिकाणी लावलेल्या बॅरिकेट्समुळे पाणी जाण्याचा मार्गच बंद झाला आहे. यातच खड्ड्यांमुळे थोडा पाऊस झाला तरी दोन फुटांपर्यत पाणी तुंबत आहे. विशेष म्हणजे बॅरिकेट्स लावल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून पाण्यातूनच रस्ता पार करावा लागत आहे. मेट्रोच्या या हलगर्जीपणामुळे कुठलीही दुर्घटना घडण्याआधी तातडीने कार्यवाही करा असे आदेश महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मेट्रो प्रशासनाला दिले आहेत. मेट्रोच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत महापौरांनी पाहणी केलीय यावेळी असे आदेश महापौरांनी दिले.
मेट्रोच्या कामासाठी भरपावसात मुंबईत अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे खड्डे खोदण्यात आले असून ड्रेनेज लाइनही तोडण्यात आल्या आहेत. रस्त्यावर लावलेल्या बॅरिकेट्समुळे पाणी वाहून जाण्याचा मार्गच बंद झाला असून पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची गंभीर दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सुचनेनुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेते यशवंत जाधव, स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगावरकर, सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी ‘मेट्रो’च्या कामांची पाहणी केली. यावेळी मॅजिक ब्रिक मेट्रो स्टेशन, मरोळ फायर ब्रिगेड, जेबीनगर मेट्रो स्टेशन, सिप्झ आदी ठिकाणी जाऊन मेट्रोच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. यावेळी उपविभागप्रमुख सुभाष सावंत, नगरसेवक सदानंद परब आदी उपस्थित होते. या भेटी दरम्यान पावसाळ्यात रस्त्यावर कोणत्याही प्रकारचे खड्डे करू नयेत असा पालिकेचा नियम असताना ‘मेट्रो’कडून मात्र अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदाई सुरू आहे. यामुळे पहिल्याच पावसात पाणी तुंबल्याचे प्रकार घडल्यानंतर महालिकेवर टीका केली जात आहे. मात्र पाणी तुंबण्याचे घटना ‘मेट्रो’च्या निष्काळजीपणामुळेच घडत असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे.