सिंधुदुर्ग - कुडाळ ते मालवण हमरस्ता हा वाहतूक वर्दळीने नेहमी गजबजलेला असून दिवसाकाठी शेकडो वाहने ये- करतात, मात्र पहिल्याच पावसात या मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मान्सून पूर्वी खड्डे बुजवण्याच्या कामे करून छातीठोकपणे पावसाळ्यात एकही खड्डा न पडण्याचे केलेले दावे फोल ठरले आहेत.
या राज्यमार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली असून या मार्गावर काही ठिकाणी पडलेले खड्डे हे अतिशय भयानक व जीवघेणे आहेत. त्यात पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहात असल्याने आतील जीवघेणे खड्डे लक्षात येत नसल्यामुळे अनेक अपघात घडतात. गेल्या काही दिवसात काळसे येथे पडलेल्या खड्यांमुळे अनेक मोटारसायकलस्वारांना अपघाताचा फटका बसला असून यामध्ये काही महिलासुदधा जखमी झाल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी केलेली तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी कूचकामी ठरली असून काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेल्याने तर ही मलमपट्टीच जीवघेणी ठरत आहे. या संदर्भात त्रस्त नागरिकांनी भाजपा पदाधिकाऱ्यांकडे दाद मागीतल्यानंतर भाजपा पदाधिकाऱ्यानी त्वरीत दखल घेतली. भाजपा सांस्कृतिक आघाडी जिल्हाध्यक्ष तथा भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा विविध आघाड्यांचे मुख्य समन्वयक बंड्या सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा उद्योग आघाडी अध्यक्ष व सिंधुदुर्ग भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख अविनाश पराडकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक तथा श्रीकृष्ण चव्हाण, भाजयुमोचे कुडाळ तालुका उपाध्यक्ष वैभव जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह बैठक घेऊन तातडीचा पाहणी दौरा आयोजित करण्याची मागणी केली.
रस्त्याची होणार चार दिवसात दुरुस्ती -
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता गोरे आणि देवरे यांच्या सह भाजपा पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक २८ जून रोजी पूर्ण रस्त्याची पाहणी करून माहिती घेतली. मालवण तालुक्याच्या हद्दीत मालवणचे भाजप तालुका अध्यक्ष श्री बाबा मोंडकर आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिले व रस्त्याच्या दुर्दशेची पाहणी केली. अधिकाऱ्यांशी कामाबाबत सूचना दिल्या. प्रत्यक्षात पाहणी दौऱ्यात बांधकाम विभागामार्फत झालेले दर्जाहीन काम अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून देत भाजपा पदाधिकाऱ्यानी कडक शब्दात फैलावर घेतले. पुढील चार दिवसात या धोकादायक ठिकाणचे खड्डे बुजवून रस्ता पूर्ववत केला जाईल, त्यासाठी आवश्यक ते योग्य दर्जाचे साहित्य व मनुष्यबळ याची व्यवस्था तातडीने केली जाईल असे आश्वासन अभियंत्यांनी तात्काळ दिले. त्यामुळे या जीवघेण्या मृत्यूच्या सापळ्यातुन तातडीने नागरिकांची लवकरच सुटका होणार आहे.
ग्रामस्थ पहारेकाऱ्याच्या भूमिकेत -
या ठिकाणी ग्रामस्थांशी चर्चा करून अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, तसेच कामाच्या दर्जावर लक्ष ठेवावे, तसेच काही अडचण असल्यास तातडीने भाजप कार्यालयात संपर्क साधावा. प्रशासनाकडून नागरिकांच्या जीविताबाबत होणाऱ्या या प्रकारामुळे एवढा निधी आणूनही भाजपा सरकारची नाहक बदनामी होत असल्याने या बाबतीत आणखी कठोर पावले उचलायला लावू नका, असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना जनतेसमोर रोखठोक सुनावले.
भाजप पदाधिकाऱ्यांनी तत्परता दाखवत तातडीने धाव घेत सदर समस्या सोडवण्यासाठी निर्णायक भूमिका घेतल्याबद्दल स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले आहे