मुंबई, दि. २१ : राज्यातील शेतकऱ्यांना पीक उत्पादनादरम्यान येणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत २०१७ च्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमुग, तीळ, सुर्यफुल,कारळे, कापूस, कांदा इ. पीक उत्पादक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ज्या शेतकऱ्यांनी विविध वित्त संस्थांकडून पीक कर्ज घेतले आहे, अशा शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक असेल तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक असणार आहे.
सर्व अन्नधान्य व गळीत धान्य पिकांसाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता विमा संरक्षित रक्कमेच्या २ टक्के किवा वास्तवदर्शी दर यापैकी जो दर कमी असेल तो, तसेच कापूस व कांदा या नगदी पिकांसाठी शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा विमा संरक्षित रक्कमेच्या ५ टक्के किवा वास्तवदर्शी दर यापैकी जो दर कमी असेल तेवढा भरणे आवश्यक आहे.
नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे झालेले पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे आदी बाबींवर या योजनेत भर देण्यात आलेला आहे. या योजनेंतर्गत अन्नधान्य पिके, गळीतधान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.