मुंबई / प्रतिनिधी -
सरकारने सर्वसामान्य व्यापाऱ्यांशी आणि इतर क्षेत्रातील लोकांशी चर्चा केल्याशिवाय GST कर लागू करू नये. हा सर्वसामान्य व्यापाऱ्यांवर अन्याय होईल, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले. पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. सदर पत्रकार परिषदेत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समवेत मनपाचे विरोधी पक्ष नेते रवी राजा, माजी आमदार चरणजीत सप्रा आणि मुंबई काँग्रेसचे महासचिव भूषण पाटील उपस्थित होते.
निरुपम म्हणाले की काँग्रेस पक्ष कधीच GST च्या विरोधात नाही. पण GST चे स्वरूप आणि लागू करण्याच्या पद्धतीच्या आम्ही विरोधात आहोत. GST आणण्याच्या मूळ विचार काँग्रेसचाच आहे. काँग्रेसचे सरकार असताना GST लागू करण्याचा प्रस्ताव काँग्रेसने मांडला होता. पण याला भाजपाच्या नेत्यांनी त्यावेळेस कडाडून विरोध केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यावेळेस GST ला विरोध दर्शविला होता आणि आज भाजपाचे सरकार आल्यावर आज GST चे गुणगान गात आहेत. सर्व अप्रत्यक्ष कर रद्द करून एकचं कर ठेवावा असे GST चे मूळ स्वरूप आहे आणि जगातील सर्व देशांमध्ये हा कर लागू आहे. पण भाजपा सरकार ज्या पद्धतीने GST लागू करणार आहे ती पद्धतच पूर्णतः चुकीची आहे.
GST मध्ये तीन कर आहेत ५%, १२%, १८% आणि २८%. सेन्ट्रल GST, स्टेट GST आणि अंतरराज्य GST (IGST). IGST हा तर Octorai सारखा आहे आणि प्रत्येक व्यवसायानुसार आणि वास्तुनुसार तो वेगळा आहे. पूर्वी ट्रक्टर सारख्या कृषी उत्पादक वाहनावर, कापड उद्योगावर याअगोदर कोणताही कर नव्हता. पण त्यावरही GST लागू केल्यावर कर लागेल. त्यामुळे व्यापारी त्रस्त आहेत. विना वातानुकुलीत (Non-AC) हॉटेलवाल्यांनाही आता कर भरावा लागणार आहे. GST जगातील बहुतांशी सर्व देशांमध्ये लागू आहे. त्याचे दर वेगवेगळे आहेत, पण एकच कर भरावा लागतो. पण भारतामध्ये प्रस्तावित GST चा दर सर्वात जास्त आहे आणि चार प्रकारचे कर आहेत. काँग्रेसची भाजपा सरकारकडे अशी मागणी आहे की त्यांनी GST लागू करण्याआधी सर्व क्षेत्रातील व्यापारी वर्गाशी चर्चा करावी, त्यांना विश्वासात घ्यावे. नाहीतर हा त्यांच्यावर मोठा अन्याय होईल असे निरुपम म्हणाले.