म्हाडातर्फे गिरणी कामगार व वारसांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 June 2017

म्हाडातर्फे गिरणी कामगार व वारसांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ


मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५८ बंद / आजारी गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांना घरे देण्याच्या उद्देशाने मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत (महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) चा विभागीय घटक) सन २०१०-११ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेत ज्या गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांना अर्ज करता आले नाहीत केवळ अशाच गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांच्यासाठी अंतिम मोहिमेअंतर्गत नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. २७ जूनपर्यंत देण्यात आलेली मुदत दि. ३१ जुलै २०१७ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

गिरणी कामगारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याबाबत विविध स्तरावरून विनंती आल्यामुळे दि. २६/०५/२०१७ ते २७/०६/२०१७ या कालावधीत ज्या गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांना ऑनलाईन अर्ज करता आले नाहीत केवळ अशाच गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दि. २८/०६/२०१७ पासून दि. ३१/०७/२०१७ रोजी २३.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांनी दिली.

"म्हाडा"मार्फत सन २०१०-११ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण १,४८,७११ गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांनी अर्ज सादर केले होते. सादर अर्जदारांची यादी म्हाडाचे संकेतस्थळ http://mhada.maharashtra.gov.in वर दि. १४/०३/२०११ व दि. २७/०४/२०१२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीत नाव समाविष्ट आहे किंवा कसे याबाबत म्हाडाचे संकेतस्थळ https://millworker.mhada.gov.in वर "गिरणी कामगार / वारसांचे नाव" किंवा "अर्ज क्रमांक" नमूद करून खातरजमा करून घ्यावी. यापूर्वी अर्ज सादर केला नसल्याची खात्री झाल्यानंतरच ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात आले आहे.

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अर्जदारास रु. १५०/- (प्रशासकीय खर्च) ऑनलाईन भरणा करणे अनिवार्य असून रु. १५०/- चा भरणा केल्याशिवाय नोंदणी करता येणार नाही. तसेच ज्या गिरणी कामगार / गिरणी कामगारांचे वारस यांना रु. १५०/- चा भरणा ऑनलाईन पद्धतीने करणे शक्य नाही केवळ त्यांनीच म्हाडाने नियुक्त केलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या शॉप नं. ३-१०, तळ मजला, सिटी व्ह्यू बिल्डिंग, डॉ. एनी बेझंट रोड, वरळी, मुंबई, वीर महाल स. गृ. नि. संस्था, तळ मजला, शॉप नं. ९-१२, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, लालबाग, मुंबई व हॉलमार्क प्लाझा, गुरुनानक हॉस्पिटल जवळ , कला नगर, वांद्रे (पूर्व), मुंबई या शाखेमध्ये कार्यालयीन वेळेत दि. ३१/०७/२०१७ दुपारी ३.०० वाजेपर्यंत व्यक्तिशः उपस्थित राहून रोख रकमेचा भरणा करून पोच पावती प्राप्त करून घ्यावी.

ऑनलाईन अर्ज करतांना नोंदणी प्रकार (Enrollment Type) मध्ये "गिरणी कामगार" किंवा "कायदेशीर वारस" बरोबर नमूद केला असल्याची खातरजमा करावी. जर मूळ गिरणी कामगार "गिरणी कामगार" ऑनलाईन अर्ज करीत असल्यास नोंदणी प्रकारामध्ये "गिरणी कामगार" नमूद करावे, मूळ गिरणी कामगार मयत असल्यामुळे जर त्यांचे वारसांपैकी कोणताही एक वारस ऑनलाईन अर्ज सादर करीत असल्यास नोंदणी प्रकारामध्ये "कायदेशीर वारस " नमूद करावे, मूळ गिरणी कामगार हयात असल्यास मूळ गिरणी कामगारांनीच ऑनलाईन अर्ज करावा वारसांनी अर्ज करू नये, मूळ गिरणी कामगार मयत असल्यास गिरणी कामगारांच्या वारसांपैकी फक्त एका वारसाने ऑनलाईन अर्ज करावा, फोटो अपलोड करण्यापूर्वी म्हाडाच्या संकेतस्थळावर दिलेली फोटो हेल्प फाईल बघावी व त्यानुसार फोटोची साईझ ३०० केबी पर्यंत असल्याची खातरजमा करूनच फोटो अपलोड करावा, असे आवाहन "म्हाडा"तर्फे करण्यात आले आहे.

Post Bottom Ad