मुंबई, ता. 21 : नोटाबंदीच्या काळात सहकारी बँकांनी स्वीकारलेल्या पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा बदलून देण्याचा रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे आभार मानले असून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा बँकांकडे पुरेसा अर्थपुरवठा होण्यास मदत होणार असून सहकारी बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना दहा हजाराची उचल द्यावी, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
नोटाबंदी काळात सहकारी बँकांनी स्वीकारलेल्या पाचशे आणि हजाराच्या नोटांबाबत अनिश्चतता होती. राज्यातील सहकारी बँकांच्या पतपुरवठ्यावर यामुळे परिणाम होत असल्याने या नोटा स्वीकारण्याची मागणी राज्याने केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे केली होती. रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकाकडे असलेल्या जुन्या नोटा बदलून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे जिल्हा सहकारी बँकांकडे आता पुरेसा अर्थपुरवठा होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या बँकांना आता शेतकऱ्यांना कर्जपुरठा करण्यात अडचण येणार नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाने गरजू शेतकऱ्यांना दहा हजाराची उचल देण्याचा निर्णय घेतला असून सहकारी बँकांनी या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. राज्य सरकार शेतकरी आणि सहकारी बँकांच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील असून शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांनी सक्रीय पाठिंबा द्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.