मुंबई / प्रतिनिधी -
झाड / वृक्ष पडू नये यासाठी महापालिकेद्वारे आवश्यक ती काळजी घेण्यात येत असतेच. तथापि, मुसळधार पाऊस,सोसाट्याचा वारा याप्रसंगी वृक्ष पडण्याची संभाव्यता असते. तसेच झाडाची फांदी किंवा काही भाग पडण्याचीही शक्यता असते. या शक्यता लक्षात घेऊन संभाव्य जिवीत हानी वा वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने नागरिकांनी झाडांजवळ जाणे /झाडांखाली उभे राहणे टाळावे; तसेच झाडांखाली वाहन उभे करणेही टाळावे, असे आवाहन महापालिकेचे उद्यान अधिक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.
पावसाळ्यादरम्यान मुसळधार पाऊस सुसाट्याचा वारा असेल तेव्हा झाडे / वृक्ष पडण्याची संभाव्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन व झाडे पडून काही दुर्दैवी घटना घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे घेतली जात असते. यामध्ये प्रामुख्याने पावसाळ्यापूर्वी झाडांची शास्त्रीय पद्धतीने छाटणी करणे, मृत झाडे हटविणे, झाडाला किड लागली असल्यास त्यावर कीटकनाशकांची फवारणी करणे, झाडाभोवती शास्त्रीय पद्धतीने अळे तयार करणे, झाड नाजूक झाले असल्यास त्याला कृत्रिम आधार देणे; यासारखी विविध कामे महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे व २४ विभाग कार्यालयांद्वारे केली जातात परदेशी यांनी म्हटले आहे.