मुंबई - पूर्वाश्रमीच्या महार समाजाच्या शौर्याचे प्रतिक असणा-या पुणे येथील भिमाकोरेगावचा विजय स्तंभ आता ख-या अर्थाने मोकळा श्वास घेणार आहे . या विजयस्तंभासह लगतची १० एकर जागा स्वत;च्या नावावर करणाऱ्या मावळद्कर कुटुंबियांना पुण्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाने अनधिकृत ठरवीत त्यांची मालकी संपुष्टात आणली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घातल्यामुळे तब्बल २०० वर्षानंतर या ऐतिहासिक विजयस्तंभावरील खाजगी मालकी जावून हे स्थळ आता जनतेसाठी खुले झाले आहे .
पुण्यातील दुसरे बाजीराव पेशवे आणि तत्कालीन ब्रिटीश सरकार यांच्यामध्ये १८१८ मध्ये झालेल्या घनघोर युद्धात ५०० महार सैनिकांनी सहभाग घेतला होता. या लढाईत बाजीराव पेशव्यांच्या अत्याचाराने त्रस्त महार बटालियनचे सैनिक त्वेषाने लढल्यामुळे पेशव्यांचा पराभव झाला होता . सदर विजयाची आठवण म्हणून ब्रिटीश सरकारने महार बटालियनच्या स्मरणार्थ मौजे पेरणे तालुका हवेली जिल्हा पुणे गट क्रमांक १०३३ मध्ये जयस्तंभ उभारला होता व सदर स्तंभाच्या देखरेखीसाठी खंडोजी माळवदकर यांची नेमणूक केली होती त्याबदल्यात माळवदकर यांना मौजे पिंपरी सांडस वार्ड केसनंद व बकोरी या गावातील एकूण २६० एकर पन्नास गुंठे जमीन कसण्यासाठी दिली होती सादर जमीन वंश परंपरेने मावळद्कर यांच्या वंशजांकडे राहील वंशज नसेल नर ही जमीन पुन्हा सरकारदरबारी जमा होईल असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र असे असताना देखील खंडोजी मावळदकर यांचे सध्याचे वंशज गुलाबराव बाबुराव मावळद्कर, नामदेव व अशोक गुलाबराव मावळद्कर तसेच सरस्वती गुलाबराव मावळद्कर यांनी भिमाकोरेगाव विजयस्तंभ व लगतची १० एकर जागा १९६५-१९६६ च्या दरम्यान स्वतःच्या नावावर करीत या ऐतिहासिक स्तंभावर स्वतःचीखाजगी मालकी दाखवली होती . भिमाकोरेगाव संरक्षण व संवर्धन समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग व विश्वस्त जेष्ठ समाजसेवक सुदामराव पवार यांच्यासह विविध संस्था संघटनांनी या प्रश्नावर अनेकदा आंदोलने केली सरकारदरबारी पाठपुराव केला मात्र मावळद्कर याला दाद देत नव्हते . अभंग व समाजसेवक राजू झनके यांनी या विषयावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांची २०१५ मध्ये भेट घेवून या विषयाची माहिती देवून चर्चा केली सर्व कागदपत्रे सादर करून सदर प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली असता बडोले यांनी भिमाकोरेगाव स्मारकास भेट दिली सर्व सबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून गांभीर्याने हा विषय हाताळण्याच्या सूचना केल्या असता याची सुनावणी पुणे हवेली उपविभागाच्याउपविभागीय अधिकाऱ्यांकडे झाली . या सुनावणी अंती मावळद्कर यांची खाजगी मालकी अनधिकृत असल्याचा निर्णय देतानाच सर्व फेरफार नोंदी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत .
दरम्यान भिमाकोरेगाव विजय स्तंभावरील खाजगी मालकी संपुष्टात आणण्या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातल्याबद्दल समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग समाजसेवक राजू झनके, जसंग बोपेगावकर , गौतम गवई, व अनेक संस्था संघटनांनी मंत्रालयात बडोलेयांची भेट घेवून त्यांचा सत्कार करीत आभार मानले . मागासवर्गीयांच्या प्रश्नांवर धडाडीने काम करीत अनेक स्तुत्य निर्णय घेतल्याबद्दल बडोले यांचा मुंबईत लवकरच जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार असल्याचे अभंग यांनी यावेळी बोलताना सांगितले