मुलभूत अधिकारांवरच आता भीम आर्मीचा भर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2017

मुलभूत अधिकारांवरच आता भीम आर्मीचा भर

राज्यभर विस्तार करण्यासाठी तरुणांना करणार एकत्र 
मुंबई, 25 June 2017 - भीम आर्मी ही दलित पॅंथरसारखी लढावू संघटना असली तरी या संघटनेकडून केवळ रस्त्यांवरील आंदोलनापेक्षा तुर्तास राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक या मुलभूत प्रश्‍नावर भर दिला जाणार आहे. भारतीय राज्य घटनेने दिलेले शिक्षणाचे अधिकार विविध मार्गाने हिरावून घेतले जात असून दुसरीकडे आर्थिक विकासाचे मार्ग बंद केले जात आहेत. दलित, आदिवासी, भटके-विमुक्‍त आणि अल्पसंख्यांकांचे मुलभूत अधिकार हिरावून घेतले जात असून या अधिकाराची लढाई लढल्याशिवाय न्याय मिळणार नाही, अशी भूमिका भीम आर्मीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याने येत्या काळात भीम आर्मीचा भर मुलभूत अधिकाराच्या लढाईवर असणार आहे. 

मुंबईत कुर्ला पूर्वेला असलेल्या नेहरू नगर येथील केदारनाथ समाजकल्याण सभागृहात आज झालेल्या बैठकीला मुंबई,ठाणे, रायगड, रत्नागिरीसह राज्यभरातून भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या बैठकीत राज्यभर भीम आर्मीचा विस्तार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्‍यात बैठका घेण्याचा निर्णय झाला आहे.2 जुलै रोजी पुण्यात समन्वय समितीची बैठक होणार असून त्यानंतर कार्यक्रमाची दिशा ठरविली जाणार आहे. यासाठी लातूर, औरंगाबाद, नागपूर, जळगाव, अमरावती, सोलापूर आदी विभागांच्या बैठका घेऊन दलित, आदिवासी, इतर मागास, अल्पसंख्यांक आदी समाजातील तरुणांना एका छत्राखाली आणले जाणार असल्याची माहिती राज्य प्रमुख अशोक कांबळे यांनी सांगितले.
भीम आर्मीकडून शिक्षण हक्‍काच्या अधिकारावर विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासोबतच आर्थिक विकासासोबत तरूणांच्या रोजगारांचा प्रश्‍न आणि त्यावरील उपाययोजना करण्यासाठीही भर दिला जाणार आहे. आंदोलनाच्या नावाखाली केवळ तरूणांची माथी भडकविण्यापेक्षा त्यांना रोजगार आणि उद्योगासाठी कसे उभे करता येईल, यावरही आज झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांनी केलेले कार्य राज्यातील तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांना एका जातीच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी भीम आर्मीकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी ज्येष्ठ लोकशाहीर संभाजी भगत यांनी दिली. बाबासाहेब हे देशाचे नेते होते, त्यांचे देशाच्या उभारणीतील योगदान समाजापर्यंत नेवून त्यांना एका जातीच्या चौकटीतून मुक्‍त करण्यासाठी भीम आर्मीची चळवळ राज्यात पोहोचेल असे मुंबई अध्यक्ष अॅड. रत्नाकर डावरे यांनी सांगितले. या बैठकीदरम्यान, राज्यभरातून आलेल्या संघटकांना नियुक्‍तीपत्र देण्यात आले. तर भीम आर्मीच्या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते विजय भिडे यांनी आज आपली एक चारचाकी गाडी दान केल्याचे जाहीर करण्यात आले. मुंबईत कुर्ला नेहरू नगर येथे या आर्मीचे मुख्य कार्यालय लवकरच सुरू होणार असल्याची माहितीही अॅड. डावरे यांनी दिली.

Post Bottom Ad