मुंबई, दि. 22 : रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरांसाठी महसूल विभागाने प्राधान्याने जागा उपलब्ध करुन द्यावी अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिल्या. राज्यातील अनुसूचित जातीतील सर्व बेघरांना घरे देण्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांच्यासह महसूल, गृहनिर्माण व सामाजिक न्याय विभागातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना बडोले यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात यावा. तसेच महानगरपालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील रहिवाशांना देखील या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. पंधरा वर्षांपासून रहिवाशी असलेल्यांना जागेचे पट्टे देण्यासंदर्भात ही विचार करण्यात यावा. राज्यातील सर्व अनुसूचित जातीतील बेघर लोकांना सन 2019 पर्यंत घरे मिळावीत यासाठी शासन प्रयत्न करीत असून यासंदर्भात विविध घटकांवर चर्चा करुन त्याबाबत विस्तृत असे धोरण ठरविण्यात येणार आहे.