मुंबई / प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेकडून कचरा उचलण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरु असून काही कंत्राटदारांनाच कंत्राटे मिळावीत म्हणून तश्या नियम व अटी असलेली टेंडर प्रक्रिया राबविली जात आहे. यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आपण पालिका आयुक्तांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे अशी माहिती काँग्रेसचे मालाड येथील आमदार अस्लम शेख यांनी पत्रकारांना दिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरु केले. या अभियानानुसार काही नियम बनवण्यात आले. एक लाख लोकांच्या मागे एक कंत्राटदार असावा असे या नियमात म्हटले आहे. परंतू मुंबई महानगरपालिका २८ लाख लोकांच्या मागे एक कंत्राटदार नेमला आहे. यामुळे मुंबईत रोज कचरा न उचलला जात नाही. झोपडपट्टी विभागात दोन दिवसामधून एकदाच कचरा उचलला जात आहे. यामुळे महापालिकेचा शून्य टक्के कचऱ्याचा दावा फोल ठरत असल्याचे शेख यांनी सांगितले. मुंबई महानगरपालिकेत एखादे कंत्राट ठराविक कंत्राटदाराला मिळावे म्हणून तसे टेंडर प्रक्रिया राबविली जाते. रस्ते विभागात असल्याने काही कंत्राटदारांनाच रस्त्याची कामे मिळत आहेत. असाच प्रकार घन कचरा विभागात सुरु असल्याने लहान कंत्राटदारांना कामे मिळत नसल्याचे शेख यांनी सांगितले.
महापालिकेच्या वतीने कंत्राटदार मुंबईमधील कचरा उचलत आहेत. यामुळे हा कचरा उचलताना किती ठिकाणी कचरा उचला, किती ठिकाणी गाड्या फिरल्या, याची शहानिशा विहायकल ट्रॅकिंग सिस्टम द्वारे तपासले जाते, कंत्राटदाराने किती कचरा उचलला आणि डम्पिंगवर नेवून टाकला याच्या वजनावर कंत्राटदाला बिलें अदा केली जातात. मात्र कचरा उचलताना पूर्ण गाडी भरून कचरा भरलाच जात नसून अर्धवट कचरा भरलेल्या गाड्या डम्पिंगवर खाली केल्या जात आहेत. यामुळे गेल्या सहा महिन्यात कचरा उचलण्याच्या बदल्यात किती कंत्राटदारांची बिले मंजूर करून रक्कम अदा करण्यात आली याची चौकशी पालिका आयुक्तांनी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.